Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं समर्थकांना मोठं आवाहन; दसऱ्याच्या एक दिवस आधीच काय म्हणाल्या?

उद्या दसरा आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन गटासह आरएसएस आणि पंकजा मुंडे यांचे दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावर होणार आहे. या मेळाव्याच्या एक दिवस आधीच त्यांनी...

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं समर्थकांना मोठं आवाहन; दसऱ्याच्या एक दिवस आधीच काय म्हणाल्या?
Pankaja Munde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2023 | 12:10 PM

बीड | 23 ऑक्टोबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी बीडच्या भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा असतो. यावर्षीही पंकजा मुंडे यांचा हा भव्य दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला त्यांचे हजारो समर्थक येणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे भगवान भक्ती गडावरून पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे उद्याच्या मेळाव्यात काही राजकीय भाष्य करणार का याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

दसरा मेळाव्याच्या पूर्वीच पंकजा मुंडे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्या समर्थकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे तुम्ही मोठ्या संख्येने दसऱ्याला येणार आहात. तुम्ही खूप उत्साहाने येणार आहात. पण तुमच्यावर प्रेम करणारी तुमची ताई म्हणून मला काळजी वाटते. मी तुम्हाला काही सूचना करणार आहे. त्याचं तंतोतंत पालन तुम्ही करा. तुम्ही घरातून निघताना खाण्याच्या वस्तू आणा. तुमची शिदोरी सोबत ठेवा. ग्लुकोजची बिस्किटे, मिठाची बरणी, साखरेची बरणी आणि पाण्याच्या बाटल्याही सोबत आणा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करा

जेव्हा तुम्ही गडावर पोहोचाल. तेव्हा तुमच्या मागून येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी वाहने पार्क करा. इतरांनाही पार्किंगसाठी जागा मिळेल, याची खबरदारी घ्या. तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी घ्या. तुम्ही मोटारसायकल अडव्या तिडव्या लावू नका. पार्किंग जिथे आहे तिथेच गाडी पार्क करा. कोणतंही वाहन अडकणार नाही हे सुद्धा पाहा. नाही तर वाहतुक कोंडीचा तुम्हालाच फटका बसेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

गमछा, टोपी, बिस्किट, पाणी सोबत ठेवा

जेव्हा तुम्ही भगवान भक्तीगडावर पोहोचाल तेव्हा ती साखर आणि मिठाची बरणी सोबत घेऊन उतरा. पाण्याची बॉटल सोबत असू द्या. सर्व वडीलधारी आणि तरुणांना विनंती आहे की डोक्यावर ठेवण्यासाठी गमछा, पंचा, उपरणं तुमच्यासोबत ठेवा. मुलांनी टोपी ठेवावी. महिलांच्या डोक्यावर पदर असतो. थोडक्यात ऊन लागणार नाही याची काळजी घ्या. येताना आणि जाताना अतिवेगाने गाडी चालवू नका. हवं तर घरातून वेळेवर किंवा वेळेच्या आधी निघा. म्हणजे घाई होणार नाही. पण घाई करू नका.

दुचाकीवरून येणाऱ्यांनी सेल्फी, फोटो, व्हिडीओ घेण्याच्या नादात चुकीच्या पद्धतीने वाहने चालवू नका, असं सांगतानाच उद्या सकाळी 11 वाजता याल अशा पद्धतीने घरातून निघा. स्वत:ची काळजी घ्या. तुम्हाला ऊन लागू नये हीच अपेक्षा आहे, असं पंकजा मुंडे यांनी या व्हिडीओत म्हटलंय.