बीडमध्ये आता भाऊ विरुद्ध भाऊ! आमदार संदीप क्षीरसागरांच्या शक्ती प्रदर्शनाला योगेश क्षीरसागर यांचं जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Feb 21, 2022 | 3:00 AM

जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली बीड नगरपालिका ही राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मागील 30 वर्षांपासूवन क्षीरसागर कुटुंबियांचे नगरपालिकेवर वर्चस्व आहे.

बीडमध्ये आता भाऊ विरुद्ध भाऊ! आमदार संदीप क्षीरसागरांच्या शक्ती प्रदर्शनाला योगेश क्षीरसागर यांचं जोरदार प्रत्युत्तर
शिवजयंतीनिमित्त संदीप आणि योगेश क्षीरसागर यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन
Follow us on

बीड : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा असल्यानं बीड इथलं वातावरण अधिकच तापलेलं दिसतंय. हे चित्र दिसून आलं नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात. बीडमधील शिवसेना नेते काका जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) आणि राष्ट्रवादीचे आमदार पुतणे संदीप क्षीरसागर(Sandeep kshirsagar) या दोघांतील शीतयुद्ध अनेक वर्षांपासून सुरुच आहे. जिल्ह्यातील सर्वच संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व येण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर शर्थीचे प्रयत्न करताना दिसतायत. मात्र आता त्यांना त्याच तुलनेत लढत देण्यासाठी आणखी एक पुतणे म्हणजेच संदीप क्षीरसागर यांचे सख्खे चुलत भाऊ रिंगणात उतरले आहेत. संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात यंदाच्या शिवजयंतीला योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय..

काका- पुतण्यानंतर आता भावा-भावात लढत

एकेकाळी शरद पवारांची साथ देणाऱ्या क्षीरसागर कुटुंबात जयदत्त क्षीरसागर , रवींद्र क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर हे तिघे भाऊ प्रसिद्ध राजकारणात मुरलेले नेते आहेत. हे तिघेही आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. मात्र भावा-भावातील आणि काका-पुतण्यातील वाद विकोपाला गेल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. आता 2019 मध्ये रवींद्र क्षीरसागर यांचे पुत्र संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगलेला दिसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी काका-पुतण्यांमध्ये प्रतिष्ठेची लढाई दिसून येते. मात्र आता या लढाईत पुतणे संदीप क्षीरसागर यांना आव्हान देण्यासाठी भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र योगेश क्षीरसागर हेही उतरले आहेत. शिवजयंती निमित्त बीडमध्ये आयोजित उत्सवात योगेश क्षीरसागर यांचे शक्तीप्रदर्शनही लक्षवेधी ठरले.

नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात योगेश क्षीरसागर यांनी केलेलं शक्तीप्रदर्शन खूप काही सांगून गेलं. काही दिवसांपूर्वी संदीप क्षीरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग मारून तरुणांची मनं जिंकली होती. मात्र त्या डायलॉगनंतर डॉन चित्रपटाचं मै हू डॉन… हे गाणं गात योगेश क्षीरसागर यांनी त्यांना थेट आव्हान दिलं. तसंच ‘पुष्पाला सांगा… डॉन आलाय…’ असा संदेशही त्यांनी जमलेल्या नागरिकांना दिला होता. त्यामुळे बीडमधील आगामी निवडणुकीत संदीप विरुद्ध योगेश या सख्ख्या चुलत भावांमधील राजकीय युद्ध अधिकच रंगतदार होणार, अशी चर्चा बीडमधील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नगरपालिकेवर कुणाचं वर्चस्व?

जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली बीड नगरपालिका ही राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मागील 30 वर्षांपासूवन क्षीरसागर कुटुंबियांचे नगरपालिकेवर वर्चस्व आहे. राज्यात सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा विक्रम करणाऱ्या डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी मागील नगरपालिका निवडणुकीत ही निवडणूक शेवटची निवडणूक असे जाहीर केले होते. आता त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही काका-पुतण्याऐवजी भावा-भावांत होणार आहे.

इतर बातम्या-

चुकीच्या पोलिओ डोसमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Wardha Crime : संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलीस कोठडी