ऐकावं ते नवलंच! औरंगाबादेत प्रियकरानेच फोडले प्रेयसीचे घर, म्हणे धडा शिकवण्यासाठी केली चोरी..

| Updated on: Oct 30, 2021 | 12:10 PM

फिर्यादी महिला प्रेयसी ही त्याच्याकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र सिकंदर विवाहित असल्याने त्याचा लग्नाला नकार होता. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी सिकंदरने घरावर डल्ला मारल्याचे कबूल केले.

ऐकावं ते नवलंच! औरंगाबादेत प्रियकरानेच फोडले प्रेयसीचे घर, म्हणे धडा शिकवण्यासाठी केली चोरी..
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः प्रेयसी सतत लग्न करण्याचा तगादा लावते म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने तिच्या घरी घरफोडी केल्याचा अजब प्रकार औरंगाबादमध्ये (Aurangabad theft) समोर आला आहे. शहरातील जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये (Jinsi Police station) आठ दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास घेण्यासाठी पोलिसांना आठ दिवस लागले. मात्र तपास (Police investigation)पूर्ण झाल्यावर गुन्हेगार समोर आला. पण तो या घरातील महिलेचा प्रियकरच असल्याचे उघड झाल्यावर, या अजब प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

35 वर्षीय महिलेच्या घरी चोरी

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी न्यू बायजीपुरा येथे एका 35 वर्षीय महिलेचे घर फोडले होते. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार महिलेच्या घरी रिक्षाचालक सिकंदर खान सतत येत होता. त्यावरून पोलिसांनी सिकंदरला शोधले आणि चौकशीसाठी ठाण्यात आणले. तोपर्यंत फिर्यादीला कोणावर संशय आहे का, तुमच्या घरी आणखी कोणाचे येणे-जाणे असते याबाबत माहिती विचारली. मात्र फिर्यादीने काहीही सांगितले नाही. दुसरीकडे सिकंदरला पकडल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

‘ती लग्नाचा तगादा लावत होती म्हणून धडा शिकवला’

दरम्यान, सिकंदरने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्यामागील कारणाची सविस्तर चौकशी केली. या दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. फिर्यादी महिला ही त्याच्याकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र सिकंदर विवाहित असल्याने त्याचा लग्नाला नकार होता. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी सिकंदरने घरावर डल्ला मारल्याचे कबूल केले.

प्रेयसीला म्हणाला गावी जातो..आणि डल्ला मारला

22 ऑक्टोबरला सिकंदरनेच फिर्यादी महिलेला तिच्या आईकडे सोडले. तेव्हा तो गावी जाणार असल्याचे सांगितले. मात्र तो तसाच माघारी फिरला आणि प्रेयसीच्या घरात चोरी केली. त्याने 57 हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला होता. त्यानंतर सिकंदर गायब होता. प्रेयसीला मात्र त्याच्यावर थोडीही शंका आली नाही. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे आणि उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर यांनी मात्र योग्य दिशेने तपास करून या गुन्ह्याची उकल केली.

इतर बातम्या-

Crime: मराठवाड्याला हादरवणाऱ्या तोंडोळी बलात्कारातील सातही आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 10 दिवसात तपास पूर्ण, अन्य 13 गुन्हे उघड

Aurangabad crime: आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या हाती, मोबाइल, जुगाराचे साहित्य अन् 89,300 रोख जप्त