VIDEO : तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं, महादेव जानकर संतापले; म्हणाले, तुला माहीत नाही…

| Updated on: Oct 04, 2023 | 1:34 PM

राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची जनसुराज्य यात्रा तुळजापूर येथे आली आहे. या यात्रेची सुरुवात तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन होणार होती. पण यापूर्वीच धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे जानकर चांगलेच संतप्त झाले.

VIDEO : तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं, महादेव जानकर संतापले; म्हणाले, तुला माहीत नाही...
Mahadev Jankar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संतोष जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, धाराशीव | 4 ऑक्टोबर 2023 : छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना ताजी असतानाच असाच प्रकार पुन्हा घडला आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते, माजी मंत्री महादेव जानकर यांनाही तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा रक्षकाच्या या अरेरावीमुळे महादेव जानकर प्रचंड संतापले आहेत. असली मग्रुरी चालू देणार नाही, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला आहे. त्यानंतर जानकर यांनी गाभाऱ्यात न जाता बाहेरूनच देवीचं दर्शन घेतलं.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर आज तुळजापूर दौऱ्यावर आहेत. रासपची जनस्वराज्य यात्रा आज तुळजापुरात दाखल झाली. या यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी महादेव जानकर तुळजाभवानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. पण त्यांना गाभाऱ्याज जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. सुरक्षा रक्षकाने त्यांना मध्येच अडवले. मंदिरातील सुरक्षा रक्षकाने यावेळी जानकर यांच्याशी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे महादेव जानकर चांगलेच संतापले होते.

सुरक्षा रक्षकाला फटकारले

महादेव जानकर यांनी हातवारे करतच या सुरक्षा रक्षकाला चांगलंच फटकारलं. तुझं नाव काय? मी एक्स मिनिस्टर आहे. तुला माहीत नाही मी कोण आहे प्रोटोकॉलमध्ये. कुणाशी कसं वागायचं याचा अभ्यास करा, अशा शब्दात त्यांनी या सुरक्षारक्षकाला झापलं. त्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेवून महादेव जानकर बाहेर आले.

मंदिर प्रशासनाने विचार करावा

या प्रकारावर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत तीव्र संतापही व्यक्त केला आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. मंदिर प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल पाहून लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असली मग्रुरी चालू देणार नाही. आमचीही देवी आहे. तुम्ही म्हणजे कोण? काय सत्ता आहे हे आम्हालाही माहीत असतं ना. चांगला दिवस असताना त्यात काही व्यत्यय नको म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. पुजाऱ्यांनीही बाहेर येऊन आरती केली. ते आत या म्हणत होते, असं जानकर म्हणाले.

सत्ता येत असते जात असते

कुणालाही रोखणं योग्य नाही. मोठ्या माणसांबद्दल असं करू नये. आम्ही मास लीडर आहोत. आम्ही आमदार, खासदार निवडून आणतो. मी मंत्री होतो. या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. या मंदिर समितीवर मीही ट्रस्टी होतो. त्यामुळे त्यांनी वागताना नीट माणसं पाहून वागलं पाहिजे. सत्ता येत असते, जात असते. पुन्हा आमची सत्ता आली तर काय करणार?, असा सवाल करतानाच हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना कुणी आदेश दिला. त्या आदेशाला कसं बाजूला ठेवायचं याची काळजी घेऊ, असंही ते म्हणाले.