Manoj Jarange : इथे लिंग भेद… मनोज जरांगे पाटील यांचा घणाघाती हल्ला, जरांगेंच्या रडावरची तिसरी व्यक्ती कोण?
मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ, बावनकुळे आणि कलेक्टर आशिमा मित्तल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. "इथे लिंग भेद नाही, महिलांचा सन्मान करतो," असे सांगत, कलेक्टरचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत असताना अशा गोष्टी सहन करणार नसल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

जालन्याच्या कलेक्टर आशिमा मित्तल यांना पुढे करून आम्हाला त्रास दिला जात आहे. छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे कलेक्टरला आमच्या अंगावर घालत आहेत. महिलेची आम्ही इज्जत केली नाही असा आरोप केला जात आहे. बावनकुळे आणि भुजबळांना सांगतो. आम्ही लिंग भेद मानत नाही. इथे लिंग भेद नाही. पुरूष आणि स्त्री दोन्ही सारखेच आहेत. त्यामुळे हा भेद इथे आणू नका. नाही तर तुम्हाला भारी पडेल. मी भल्या भल्यांना नमवलं आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अंतरवली सराटीत पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी बावनकुळे, भुजबळ यांच्यासह आशिमा मित्तल यांच्यावरही जोरदार टीका केली.
मनोज जरांगे यांच्या रडावर आज तिसरी व्यक्ती म्हणजे आशिमा मित्तलही आल्या. जरांगेंनी मित्तल यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. जिल्हाधिकारी लेडीज होत्या. त्यांची इज्जत केली. ताई शिवाय बोललो नाही. भुजबळ म्हणाले कलेक्टर नर्व्हस झाल्या. म्हणजे भुजबळ आणि बावनकुळेंनी जालन्याच्या कलेक्टरला आमच्या अंगावर घातलं होतं का? जालन्याच्या कलेक्टर नर्व्हस झालेल्या भुजबळांना काय माहीत? सगेसोयरे आहेत का? यांना काय माहीत? त्या बावनकुळ्याला काय माहीत? बावनकुळ्या बदला घ्यायच्या मागे लागू नको. कलेक्टरला मागे घालू नको, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
कलेक्टरचा वापर
आशिमा मित्तल आंदोलनाच्या ठिकाणी तीनदा आल्या. त्यांचा आम्ही सन्मान केला. मी भलेभले नेते आणि अधिकाऱ्यांची जिरवली आहे. बावनकुळे आणि भुजबळांमुळे कलेक्टरने आम्हाला त्रास दिला तर सोडणार नाही. आम्ही मराठ्यांनी फासा टाकला तर त्यातून तुम्ही निघणार नाही. मी कलेक्टरला ताईशिवाय बोललो नाही. त्यांची इज्जत केली. बावनकुळ्या तू कलेक्टरला पुढे घालून शहाणपणा करू नको. कलेक्टरचा गैरवापर होत आहे. बावनकुळे वापर करत आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
तर तुम्हाला जड जाईल
यावेळी त्यांनी आशिमा मित्तल यांनाही सुनावले. मी तुम्हाला इज्जतीनेच बोललो. तुमची कदरच केली. तुम्ही बावनकुळ्यांचं ऐकून गोरगरीबांचं नुकसान करू नका. तुम्ही जिल्ह्याच्या मालक आहात. सर्व लेकरं तुम्हाला सारखी आहेत. जातीवाद करू नका. जड जाईल. मराठ्यांसमोर हे टिकत नाही. या जिल्ह्यात तुमचा सन्मान होईल असं वागा, असा इशारा त्यांनी मित्तल यांना दिला.
कलेक्टरने जातीभेद करू नये
जनता नेत्याला आणि अधिकाऱ्यांना बोलतच असते. इथे लिंग भेद नसतो. पुरुष आणि स्त्री असं काही नसतं. अधिकाऱ्यात लिंग भेद नसतो. राजकारणात लिंग भेद नसतो. स्त्रियाही मंत्री झाल्या. तुम्ही लिंग भेद आणू नका. लिंगभेदच करायचा तर त्या पदावर राहू नका. तुम्ही कलेक्टर आहात. लिंग भेदाचा संबंध काय? तुम्ही सक्षम अधिकारी आहात. तुमच्याकडे पुरुष आणि महिलाही येणार आहेत. मी महिला आहे. पुरुषांनी येऊ नका असं म्हणाल तर योग्य नाही. हा लिंगभेद चांगला नाही. वर्णभेद चांगला नाही. जातीयभेद चांगला नाही. कलेक्टरने जातीभेद करू नये, अशा शब्दात त्यांनी सुनावले.
तुमची इज्जत
पत्रकार परिषद घेणं कलेक्टरचं काम नाही. पत्रकार परिषद घ्यायला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का? हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. ते कलेक्टरने का हातात घेतलं? मराठ्यांना सर्व दिलं म्हणता. आमच्या मागण्या जिल्ह्यास्तरावरच्या नाही. राज्य स्तरावरच्या आहेत. तुम्ही का बावनकुळेंचं ऐकून मध्ये मध्ये करत आहात? सरकार आणि आम्ही बघू. तुम्ही कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं करू नका. तुमची इज्जत कायम राहील असंच वागा, असा सल्लाही त्यांनी दिला.