
गेल्या चारपाच दिवसापासून भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. प्रकाश महाजन यांनी मंत्री नितेश राणे यांची उंची काढल्यानंतर नारायण राणे यांनी महाजन यांची औकात काढली. त्यानंतर प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात थेट आंदोलन करत नारायण राणेंविरोधात दंडही थोपाटले. त्यानंतर आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांना डिवचलं आहे. कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन? असा सवालच राणेंनी केला आहे. त्यामुळे राणे आणि महाजन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार नारायण राणे आज धाराशिवला आले होते. राणेंनी सहकुटुंब आई तुळजा भवानीचे दर्शन घेऊन देवीला कमळाचं फूल अर्पण केलं. राणेंनी तुळजा भवानीची आरतीही केली. यावेळी मंदिर संस्थांकडून राणे कुटुंबियांचा सत्कारही करण्यात आला. आरतीनंतर राणेंनी मीडियाशी संवाद साधला. आई तुळजा भवानीच्या आशीर्वादानेच मी आयुष्यात यशस्वी झालो आहे, असे उद्घार नारायण राणे यांनी काढले. त्यानंतर त्यांनी प्रकाश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मी दिल्लीला होतो. तो इकडे कुठे उभा राहातो? कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन? कोण विचारतोय त्याला? तो जिथे जाईन तिथे मी जायचं का? असा सवाल नारायण राणे यांनी केला. त्याची आणि माझी बरोबरी करू नका, असेही राणे म्हणाले.
मंत्री नितेश राणे यांनी राज्यात भाजपचे सरकार आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांना लक्षात ठेवावं, असं म्हटलं होतं. त्यावरून महायुतीचे नेते चांगलेच संतापले होते. खासकरून शिंदे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरही नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो. नितेश यांचं वक्तव्य चुकीचं आहे. मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा, असं म्हणत राणेंनी नितेश यांचे कान टोचले आहेत. तसेच कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे, त्याबाबतही मी सूचना देणार आहे, असंही ते म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे का? असं राणेंना विचारण्यात आलं. त्यावर राणेंनी बोलणं टाळलं. मल माहीत नाही. येऊ देत एकत्र. चांगली गोष्ट आहे, असं म्हणून राणेंनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं.