धावत्या एसटीच्या दाराचं हुक तुटलं अन् प्रवाशी खाली कोसळला, दोष द्यायचा कुणाला?; एसटीतून प्रवास करणं पडलं महागात

| Updated on: Jun 21, 2023 | 11:33 AM

नांदेडमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. एसटीतून प्रवास करत असताना एसटीच्या दाराचे हूक निघाल्याने प्रवासी खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.

धावत्या एसटीच्या दाराचं हुक तुटलं अन् प्रवाशी खाली कोसळला, दोष द्यायचा कुणाला?; एसटीतून प्रवास करणं पडलं महागात
passenger died
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड : पावसाळ्यात रस्ते खराब होतात. रस्त्यावर खड्डे पडतात आणि त्यामुळे अनेकांचा नाहक बळी जातो. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. पण राज्यात अद्याप पावसाळा सुरू झालेला नसतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ते खराब असल्यामुळे धावत्या एसटीच्या दाराचं हूक उघडलं गेलं आणि एसटीतून प्रवाशी खाली पडला तो थेट एसटीच्या चाकाखाली आला. त्यामुळे या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तसेच ग्रामस्थांमधून संतापही व्यक्त होत आहे. या प्रवाशाच्या मृत्यूला जबाबदार कोण? एसटी की रस्ते विभाग? असा सवालही संतप्त नागरिक करत आहेत.

लक्ष्मण शेषराव गायकवाड असं या 40 वर्षीय प्रवाशाचं नाव आहे. ते वीट कामगार आहेत. कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाट्यावर ही घटना घडली आहे. लक्ष्मण गायकवाड हे एसटीने प्रवास करत होते. आंबुलागा येथून दोन किलोमीटरवर अंतरावर शेल्लारी फाट्याजवळ हा अपघात घडला. ही बस मुखेड आगारातील होती. कंधारहून मुखेडकडे जात असताना हा अपघात झाला. गायकवाड हे सावरगाव या आपल्या सासुरवाडीला जात होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

हे सुद्धा वाचा

बस आदळली अन्

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आंबुलागा ते सावरगावपर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी रस्ता उबडखाबड झाला आहे. चढ आणि घाट वळण असल्याने या रस्त्यावरून एसटी आदळत आपटतच जात असते. त्यामुळे प्रवाशांनाही अशाच अवस्थेत प्रवास करावा लागत आहे. लक्ष्मण गायकवाड हे एसटीतून प्रवास करताना एसटीच्या दारातच उभे होते.

शेल्लाळी पाटीच्या जवळ चढउतार असल्याने आणि खराब रस्ता असल्याने त्यावरून जाताना बस जोरात आदळली. त्यामुळे एसटीच्या दाराचं हूक अचानक उघडलं आणि गायकवाड एसटीतून फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असं प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलं.

घराचं छत्र हरपलं

गायकवाड हे वीट कामगार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीची आहे. त्यांना पत्नी, चार मुली, चार बहिणी, दोन भाऊ आणि आई असा मोठा परिवार आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घराचा आधारच गेल्याने गायकवाड कुटुंब हवालदिल झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मुलींच्या शिक्षणाचं काय?

गायकवाड यांच्या चार मुलींपैकी मोठी मुलगी शिक्षण घेत आहेत. मोठी मुलगी इयत्ता 8वीला आहे. तर तीन मुली लहान आहेत. गायकवाड वीट भट्टीवर रोजंदारी कामगार म्हणून काम करत होते. त्यातूनच त्यांचा घर खर्च चालत होता. काम मिळेल तेव्हा ते काम करत होते.आंबुलगा येथील साडूभाऊ यांना भेटून सावरगाव येथे सासरवाडीला जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.