चपलेत आयफोन, कानात बारके इअरफोन, पेपर फोडणारा जाळ्यात अडकलाच! औरंगाबादची घटना

राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्याला तरुणाला पोलिसांनी अटक केली. तसेच दोन ठिकाणी हायटेक पद्धतीने कॉपी करणाऱ्या तरुणांवरही पोलिसांनी कारवाई केली.

चपलेत आयफोन, कानात बारके इअरफोन, पेपर फोडणारा जाळ्यात अडकलाच! औरंगाबादची घटना
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 10:24 AM

औरंगाबादः शनिवारी राज्यभरात ठिकठिकाणी कारागृह पोलीस शिपाई पदासाठी परीक्षा (Police exam) झाली. या लेखी परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या उमेदवाराला औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) जेरबंद केले. प्रश्नपत्रिका लीक करणारा आरोपी विकास परमसिंग बारवाल असून तो जालना येथील अंबड तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आयफोन आणि अत्यंत छोटे इअरफोन्स जप्त केले. विशेष म्हणजे या तरुणाने चपलेत आयफोन लपवून आत नेला होता.

जालन्याचा तरुण, औरंगाबादेत अटक

औरंगाबादमधील लालटाकी रोड परिसरात रेसिडेन्शियल केंद्रावर हा प्रकार घडला. केंद्रावर परीक्षा सुरु झाल्यानंतर एका कक्षात सुपरवायझरला परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवाराकडे मोबाइल असल्याचे आढळून आले. पर्यवेक्षिक वर्षा विजयकुमार परजेशी यांनी उमेदवार विकास बारवाल याच्याताब्यातून आयफोन मिनी जप्त केला. तसेच त्याच्या कानात छोट्या आकाराचे इअरफोन्स होते. विकासने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवला होता. या ग्रुपमध्ये 3 सदस्य होते. तोफखाना पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

जवाहर कॉलनीत अंतर्वस्त्रात ब्लूटूथ लपवणारा अटकेत

औरंगाबादमधील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी शाळेच्या केंद्रात हा प्रकार घडला. कडेकोट बंदोबस्त असताना सोमनाथ विठ्ठल मोरे हा संशयास्पदरीत्या आढळला. वरील शर्टच्या आत त्याने आणखी एक टीशर्ट घातला होता. त्याला आतून पाकीट बनवून त्यात मोबाइल, मास्टरकार्ड म्हणजेच ब्लूटूथ कनेक्टर डिव्हाइस बसवलेले होते. तर कानात ज्वारीच्या दाण्याएवढे इअरफोन लपवलेले होते.

नगर येथील केंद्रावर डमी उमेदवार

नगर जिल्ह्यातील दादासाहेब रुपवते परीक्षा केंद्रावर नीलेश कमल सुरदंडे या डमी उमेदवाराला पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश आले. तो गणेश सुरेभ भवर या उमेदावाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला होता. मात्र परीक्षा केंद्रात प्रवेश करताना ओळखपत्र तपासून पहात असतानाच तो डमी उमेदवार असल्याचे लक्षात आले. मात्र त्याने तत्काळ पलायन केले. त्याच्याविरुद्धही तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इतर बातम्या-

Omicron ची धास्ती! औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेसह विदेशातून 46 जण आले, 21 जण निगेटिव्ह

Clean Nagpur | घरीच करा कचऱ्याची विल्हेवाट, अन्यथा 15 पासून कचरा उचलणार नाही?