मायनं मंगळसूत्र गहाण ठेवलं, पण ऊसतोड कामगारांच्या मुलींनी नशिब काढलं; तिन्ही पोरी…

| Updated on: Jun 26, 2023 | 1:00 PM

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या तीन मुलींनी नाव काढलं आहे. या तिन्ही मुली पोलीस दलात भरती झाल्या आहेत. अफाट कष्ट आणि जिद्दीच्या बळावर या मुलींनी हे यश संपादित केलं आहे.

मायनं मंगळसूत्र गहाण ठेवलं, पण ऊसतोड कामगारांच्या मुलींनी नशिब काढलं; तिन्ही पोरी...
beed news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड : गरीबी कितीही असली आणि शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेतेच. कारण देणाऱ्यांना हजार कारणं असतात. पण जिद्द असणारे प्रत्येक कारणावर मात करून पुढे जात असतात. मग तुम्ही शहरात राहता की खेड्यात, तुम्ही फ्लॅटमध्ये राहता की झोपडपट्टीत याने काहीच फरक पडत नाही. बीडच्या परळीतही अशीच एक दिलासादायक घटना घडली आहे. ऊसतोड कामगारांच्या तीन मुलींनी गरीबी, दारिद्रय, संकटांवर मात करत नेत्रदीपक यश मिळवलं आहे. तिन्ही बहिणी पोलीस दलात भरती झाल्या आहेत. जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या मुलींनी हे यश मिळवलं असून त्याची आता संपूर्ण बीडमध्ये चर्चा होत आहे.

परळीतील सेलू तांडा येथील या ऊसतोड कामगारांच्या मुली आहेत. सोनी, शक्ती आणि लक्ष्मी असं या तिन्ही बहिणींचं नाव आहे. त्यांचे वडील मारूती जाधव हे ऊसतोड कामगार म्हणून सुरुवातीला काम करत होते. पण त्यांची मेहनत आणि हुशारी पाहून त्यांची मुकादम म्हणून नियुक्त केली गेली. जाधव कुटुंबाकडे गावात शेत जमीन नाही. संपत्ती नाही. पाच मुली आणि दोन मुले हिच काय त्यांची संपत्ती आहे. कुटुंब मोठे असल्याने रोज राबण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, काबाडकष्ट करत असताना मुलांना शिकवण्यास ते विसरले नाही. मुलांना शाळेत घातलं आणि त्यांच्या शिक्षणाकडे मारूती जाधव यांनी स्वत: जातीने लक्ष घातलं.

हे सुद्धा वाचा

चार वर्ष कसून सराव

मारूती जाधव यांच्या कष्टात त्यांच्या पत्नी कमलाबाई जाधव यांनी त्यांना मोलाची साथ दिली. मुलींच्या शिक्षणासाठी कमलाबाईंनी मंगळसूत्र गहाण ठेवलं. आईने शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवल्याची सल या तिन्ही मुलींच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलं आणि पोलीस भरतीसाठी कठोर मेहनत घेतली. मारुती जाधव यांची मोठी मुलगी सोनालीची कोरोना काळात पोलीस भरतीमध्ये निवड झाली.

दुसरी मुलगी शक्ती आणि लहान मुलगी लक्ष्मी या दोघींची नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झाली. तिन्ही बहिणी गेल्या चार वर्षापासून पोलीस भरतीसाठी कसून सराव करीत होत्या. अभ्यास करीत होत्या. एकाच कुटुंबाचे तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात सेवेत दाखल होणे ही परळीतील पहिलीच घटना आहे. त्यामुळे तालुक्याचं नाव उंचावलं आहे.

रोल मॉडल बनल्या

परळीत पहिल्यांदाच तीन मुलींची आणि एकाच घरातील तीन मुलींची पोलीस दलात भरती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोनाली, शक्ती आणि लक्ष्मी या तिन्ही सख्खा बहिणी ऊसतोड कामगारांच्या मुलींच्या रोल मॉडल बनल्या आहेत. सावित्रीच्या लेकी शिकल्या तर मोठ्या पदावर पोहोचू शकतात. हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या पोलीस दलातील निवडीचा सेलू तांडा येथील गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत करून आनंद साजरा केला आहे.

जन्माचं सार्थक झालं

मारुती जाधव यांच्या या तिन्ही सख्ख्या मुलींनी परळी तालुक्याची मान महाराष्ट्रात उंचावली आहे. दरम्यान इतर मुलींना आणि महिलांना प्रेरणादायी ठरणाऱ्या जाधव कुटुंबातील या तिन्ही संख्या बहिणींचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. आपल्या मुलींच्या या यशावर मारुती जाधव आणि कमलाबाई यांनीही आनंद व्यक्त केला आहे. आमच्या जन्माचं सार्थक झालं, अशी प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली आहे.