Aurangabad Gold: ऐन सणाला का रुसली चांदी अन् सोनंही बसलं? सराफा बाजाराला हवंय चैतन्य, पहा काय आहे स्थिती?

| Updated on: Sep 11, 2021 | 8:11 PM

तालिबानी दहशतवादींनी अवघं अफगाणिस्तान गिळंकृत केल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठं चिंतेचं वातावरण आहे. कमोडिटी मार्केटमधील चढ-उताराचे परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येतात. तसेच जागतिक पातळीवर तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Aurangabad Gold: ऐन सणाला का रुसली चांदी अन् सोनंही बसलं? सराफा बाजाराला हवंय चैतन्य, पहा काय आहे स्थिती?
सोने चांदी दर
Follow us on

औरंगाबाद: कोरोनानं काही काळ का होईना आपला पसारा आवरलाय. वरुणराजानं राज्यभरात दमदार हजेरी लावलीय. प्रशासनानंही दीड वर्षांपासून घातलेली निर्बंध काहीशी शिथील केली आहेत. सणासुदीच्या हंगामात विविध ठिकाणच्या बाजारात आशेची फुलं उमलत असली तरीही सराफा बाजारावर मात्र अजूनही अस्थिरतेचं मळभ दाटलंय. गणपती आणि महालक्ष्मीच्या काळात सराफा बाजारात (Sarafa bajar in Aurangabad) चैतन्य फुलेल, या आशेवरही काहीसे विरजण पडल्याचेच चित्र आहे. तरीही घसरलेले भाव हीच सुवर्णसंधी जाणून सूज्ञांनी यात गुंतवणूक (Investment in GOld) केली पाहिजे, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात येत आहे.

औरंगाबादमध्ये आजचे भाव

शहरातील सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 47 हजार रुपये प्रति तोळा एवढे होते. कालच्यापेक्षा हे भाव दोनशे रुपयांनी वाढलेले असले तरीही दरात लक्षणीय अशी चढण दिसलेली नाही. तसेच चांदीच्या दरातही कालपेक्षा आज काहीशी सुधारणा दिसून आली. आज शहरात शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये प्रति किलो एवढे नोंदले गेले. कालच्या दरांपेक्षा आजच्या चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ दिसून आली. आज शनिवारी औरंगाबादच्या सराफा बाजाराला सुटी असते. तरीही महालक्ष्मीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर काही दुकान मालकांनी आपली दालने सुरु ठेवली होती. मात्र बहुतांश सराफा मार्केट आज बंद राहिले.

आठवडाभर दरांचा साप-शिडीचा खेळ

06 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर हा आठवडा सोन्या-चांदीच्या दरांच्या दृष्टीने प्रचंड अस्थिर समजला गेला. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने काही प्रमाणात तर चांदीने चांगलीच उसळी घेतली होती. सोन्याचे दर 47 हजार 500 रुपये प्रति तोळा होते तर चांदीचे दर 69,200 रुपये प्रति किलोच्या आसपास होते. उत्सवाच्या सुरुवातीला दर वाढल्याने आठवडाभर दरात आणखी वृद्धी पहायला मिळेल, असे वाटले होते. मात्र तसे न होता दरांत प्रचंड अस्थिरता दिसून आली आणि 200 ते 400 रुपयांच्या आसपासच्या दरातच सापशिडीचा खेळ सुरु असल्याचे दिसून आले. आठवड्याच्या अखेरीसही दरात फार प्रगती झालेली दिसली नाही.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव

महाराष्ट्रात सध्या गौरी-गणपतींमुळे उत्साह असला तरीही सोने-चांदीसारखी मोठी गुंतवणूक ही ग्राहक दूरदृष्टी ठेवून करत असतात. गेल्या वर्षी असंख्य कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाल्याने तसेच नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने, घरा-घरातील आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र आहे. अशातच येत्या काळात तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक करण्याच्या मानसिक स्थितीत ग्राहकराजा नाही, असे म्हणता येईल. तसेच तालिबानी दहशतवादींनी अवघं अफगाणिस्तान गिळंकृत केल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं चिंतेचं वातावरण आहे. याचे थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येतात. कमोडिटी मार्केटमधील चढ-उताराचे परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येतात. असे असले तरीही घसरलेल्या दरातच खरेदी करणे हा सूज्ञपणा असल्याचे, तज्ञांचे मत आहे.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

इतर बातम्या- 

Gold-Silver Rate : सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या किती महाग झालं 10 ग्रॅम सोनं?

Gold Hallmarking: केंद्र सरकार दागिन्यांच्या हॉलमार्किंगचा ‘हा’ नियम पुन्हा बदलणार?