आधी शहर स्वच्छ करा, मग नाव बदलण्याच्या फालतू चर्चा करा, औरंगाबादमध्ये लेखक अरविंद जगताप यांचे वक्तव्य

| Updated on: Nov 01, 2021 | 5:29 PM

सामान्य नागरिकांच्या मूळ समस्या सोडून राजकारणी लोक आपली दिशाभूल करतात. ते वेगळाच खुळखुळा वाजवत राहतात. मग खरा प्रश्न आपण विसरतो आणि त्या खुळखुळ्याच्या आवाजाच्या दिशेनेच पाहात राहतो. इथे विचार करणाऱ्यांनी योग्य भूमिका बजावली पाहिजे, असे मत न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले.

आधी शहर स्वच्छ करा, मग नाव बदलण्याच्या फालतू चर्चा करा, औरंगाबादमध्ये लेखक अरविंद जगताप यांचे वक्तव्य
आधी शहर स्वच्छ करा, मग नामकरण करा- अरविंद जगताप यांचं वक्तव्य
Follow us on

औरंगाबादः शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून सुरु असलेल्या वादावर लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी संताप व्यक्त केला आहे. शहरात प्रचंड खड्डे आहेत, ठिकठिकाणी कचरा साठलाय आणि या शहराला तुम्ही संभाजीराजेंचं नाव देणार? खबरदार असे कराल.. आधी शहराचा विकास करा, शहर स्वच्छ करा आणि मग या फालतूच्या चर्चांमध्ये नागरिकांना गुंतवा, एक सामान्य नागरिक म्हणून ही आमची धमकी आहे,  असे वक्तव्य अरविंद जगताप यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केले. विविध पक्षांचे राजकारणी विकासाची कामं सोडून अशा व्यर्थ चर्चांमध्ये नागरिकांची दिशाभूल करत असल्याचं मत जगताप यांनी व्यक्त केलं. मूळचे बीडचे असलेले अरविंद जगताप यांचे शिक्षण औरंगाबादमध्येच झाले. या शहराशी त्यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळेच या शहराच्या नावावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.

मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी सामान्य नागरिक

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या राजकारणावरून अरविंद जगताप यांनी नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. दै. दिव्य मराठी वृत्तपत्राच्या दिवाळी अंक प्रकाशनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. अरविंद जगताप पुढे म्हणाले. इथे एवढी धूळ आहे, कचऱ्याचे साम्राज्य आहे. तरीही या शहराला नाव द्यायचे आहे? हे राजकारण आहे तुमचं? या शहराचं नाव संभाजी महाराज यांच्या नावाशी जोडण्यापूर्वी आमची सामान्य नागरिक म्हणून धमकी आहे की संभाजी महाराजांचे नाव या खड्ड्यांच्या धुळीच्या आणि कचऱ्याच्या शहराला द्यायचे नाही. लोकांना अशा फालतू गोष्टींमध्ये अडकवून ठेवू नका. मी कुठल्याही पक्षाचे समर्थन करत नाही. असेही अरविंद जगताप यांनी स्पष्ट केले.

खुळखुळा कोणता हे नागरिकांनी ओळखावे- न्या. नरेंद्र चपळगावकर

अरविंद जगताप यांनी राजकारणावरून केलेल्या वक्तव्याला सहमती दर्शवत याच कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे न्या. नरेंद्र चपळगावकर यांनीही आपले मत व्यक्त केले. सामान्य नागरिकांच्या मूळ समस्या सोडून राजकारणी लोक आपली दिशाभूल करतात. ते वेगळाच खुळखुळा वाजवत राहतात. मग खरा प्रश्न आपण विसरतो आणि त्या खुळखुळ्याच्या आवाजाच्या दिशेनेच पाहात राहतो. इथे विचार करणाऱ्यांनी योग्य भूमिका बजावली पाहिजे, असे मत न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले. शहरातील एमजीएम कॉलेजच्या आइनस्टाइन सभागृहात सोमवारी झालेल्या दिवाळी अंक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची मागणी आहे. हा आमचा अजेंडा आहे आणि तो पूर्णत्वास नेणारच, असे वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा, असा इशारा शिवसेनेला दिला आहे. आगामी औरंगाबाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याची चिन्हं आहेत. मात्र सामान्य नागरिकांनी काय भूमिका घ्यावी, याबद्दलचे वक्तव्य लेखक अरविंद जगताप यांनी केले.

इतर बातम्या-

औरंगाबादमधील नवीन बीड बायपासचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येण्याची शक्यता

औरंगाबादः हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवल्यास शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, प्रवीण दरेकरांचा इशारा