औरंगाबादमधील नवीन बीड बायपासचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येण्याची शक्यता

औरंगाबादमधील नवीन बीड बायपासचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येण्याची शक्यता
औरंगाबादमधील नव्या बीडबायपास रोडचे काम लवकरच पूर्ण होणार

औरंगाबादः सातारा परिसरातील नव्या बीड बायपास रोडचे (New Beed Bypass ) काम नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. शहरातील जुना बीड बायपास हा दोन पदरी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरच होता. मात्र आता या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी हा मार्ग शहराबाहेरून म्हणजे आडगाव ते करोडी असा 30 किलोमीटर लांबीचा असेल. दरम्यान येत्या महिनाभरात या मार्गाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून तो वाहतुकीसाठी लवकरच खुला केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यावर महामार्गाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना औरंगाबादमध्ये निमंत्रित करण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

आडगाव ते करोडी 30 किमी लांबीचा रोड

नवा बीडबायपास रोड हा आडगाव ते करोडी असा 30 किमी लांबीचा आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना हा मार्ग शहराबाहेरून जाईल. त्याचा मार्ग आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, माळीवाडा असा आहे. नवीन बायपासचे काम 2018 मध्ये सुरू झाले. ऑगस्ट 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला दिलेली होती. मात्र, कोरोनामध्ये मजूर, अभियंते आपापल्या गावी गेल्याने हे काम रखडले. त्यामुळे एनएचएआयने ठेकेदाराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. आता नोव्हेंबरअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल. 30 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर लहान-मोठे एकूण 112 पूल आहेत. तसेच कांचनवाडी, एएस क्लब येथे दोन उड्डाणपूल असतील. या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण 613 कोटी रुपये खर्च आला आहे. रस्त्यावर कांचनवाडी ते करोडीपर्यंत सर्व्हिस रोड असेल तर आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, एसआरपीएफ कँप, वाळूज लिंक रोड, तिसगाव चौफुली, करोडी येथे भुयारी मार्ग असेल.

जुन्या बीडबायपासच्या कामामुळे नागरिक हैराण

सध्या औरंगाबाद शहराच्या आतून जाणाऱ्या जुन्या बीडबायपास रोडवरील पुलाचे कामही सुरु आहे. भर पावसाळ्यात या पुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आताही रस्त्याचे काम अजून सुरुच अससल्याने या रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघातदेखील घडत आहेत.

अखेरच्या टप्प्यात अहोरात्र काम सुरु

नवीन बीड बायपासचे काम फक्त दोन ठिकाणी बाकी आहे. साताऱ्यात एसआरपीएफ कॅम्पजवळ आणि नगर रोडवर एएस क्लबच्या उड्डाणपुलाचे काम अद्यापही सुरू आहे. साधारण महिनाभरात हे काम पूर्ण होईल. सध्या दिवसरात्र येथे काम सुरू आहे.

गडकरी आले नाहीत तर ऑनलाइन उद्घाटन

केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे प्रयत्नशील आहेत. या दौऱ्यानिमित्त गडकरी औरंगाबादला आले तर जालना रोडवरील अखंड उड्डाणपुलाची अधिकृत घोषणा करतील, असे आडाखे भाजपमध्ये बांधले जात आहेत. याशिवाय ऐनवेळी गडकरींनी औरंगाबादमध्ये येण्यास नकार दिला तर त्यांच्याच हस्ते आभासी पद्धतीने ऑनलाइन उद्घाटन करण्याचाही पर्याय या नेत्यांनी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या-

Crime: बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड

औरंगाबादः हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवल्यास शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, प्रवीण दरेकरांचा इशारा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI