आज तुम्ही लाडके आहेत, उद्या तुम्ही… नितेश राणेंना शरद पवार गटाच्या आमदाराचा खोचक सल्ला

औरंगजेबाच्या कबरीच्या विवादामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर हटवण्याची मागणी केली आहे. नागपुरात झालेल्या हिंसेनंतर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

आज तुम्ही लाडके आहेत, उद्या तुम्ही... नितेश राणेंना शरद पवार गटाच्या आमदाराचा खोचक सल्ला
nitesh rane
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 1:25 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. त्यातच नागपुरात काल मोठा हिंसाचार उफाळला. नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड झाली. या घटनेचे पडसाद विधीमंडळातही पहायला मिळाले. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वादग्रस्त विधाने टाळण्याची तंबी दिल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन नितेश राणे यांनी मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे कोणाला चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.

रोहित पवारांचा घणाघात

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरही भाष्य केले. कोरटकर, सोलापुरकरला पकडण्यासाठी सरकारला इच्छाशक्ती लागेल. सरकार या टुकार लोकांना पाठबळ देत आहेत आणि यांचे प्रमुख नेते शांतता ठेवा म्हणून सांगत आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील लोक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. वातावरण गरम करणारे बोलून जाणारे दुसरे आहे. परंतु त्यांच्या मागील डोकं दुसऱ्यांचं आहे. सामान्य लोकांचे विषय प्रश्न सोडवत असाल तर कुठलीही कबर काढा. फक्त वातावरण दूषित करण्यासाठी औरंगजेबाचा विषय आणत आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

नितेश राणे यांचे वय कमी आहे. मंत्री झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूश होण्यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहेत. परंतु तुम्ही महाराष्ट्राचे नुकसान करत आहेत. आज तुम्ही लाडके आहेत, उद्या राहणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही रोहित पवारांनी म्हटले.

नितेश राणे काय म्हणाले होते?

नागपूरच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वादग्रस्त विधाने टाळण्याची तंबी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी खरंच तंबी दिली का? याबाबत आता खुद्द नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आपलं नाव असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर घटनेच्या संदर्भात विधानसभेत निवेदन सादर केलं आहे. यामध्ये नागपूरच्या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आंदोलन करत होते. मग तो विषय मिटला. मात्र, त्यानंतर सायंकाळी काही लोक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि हिंसाचाराची घटना घडली. मात्र, हे सर्व नियोजित होतं असा संशय आहे. नागपूरमध्ये अशा प्रकारची हिंसा घडवायची होती का? याची देखील आता चौकशी होणार आहे. नागपूरच्या घटनेत पोलिसांवर हल्ला करण्यात आला, पोलिसांवर हल्ला करण्याचं कारण काय? एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला गेला. अशा प्रकारे हल्ले करण्यात आल्यानंतर राज्य सरकार गप्प बसेल असं वाटतं का? आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा अधिकार कोणी दिला?”, असे नितेश राणे म्हणाले.