
Bacchu Kadu Nagpur Protest : माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तसेच इतर मागण्यांसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांचा मोर्चा सध्या नागपुरात पोहोचला आहे. कर्जमाफी करण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्या अन्यथा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नागपुरात दाखल झाले आहेत. सध्या कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चासाठी नागपुरात हजारो शेतकरी टॅक्टर, मिळेली ती वाहने घेऊन आले आहेत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले आहे. सध्या कडू नागपूर-हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.
बच्चू कडू नागपुरात पोहोचल्यानंतर सभा घेणार होते. मात्र शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता त्यांनी सभास्थळी नजात नागपूर-हैदराबाद महामार्गावरच सभा घेतली. या सभेत बोलताना ही लढाई सोपी नाही. प्रत्येकाला बलिदान द्यावे लागेल. प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल. तरच ही लढाई यशस्वी होईल, असे म्हणत या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कडू यांनी केले.
दरम्यान, बच्चू कडू यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक होत आहेत. याबाबबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता. बच्चू कडू यांचं मागणीपत्र आले आहे. त्यातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येतील, तातडीने निर्णय घेता येतील, ते निर्णय आम्ही घेऊ. तसे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकार कडू यांच्या या आंदोलनाची नेमकी कशी दखल घेतली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.