मनोज जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, केली मोठी घोषणा…

मराठा आरक्षणासाठी सरकारला घेरणारे मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मनोज जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, केली मोठी घोषणा...
bacchu kadu and manoj jarange patil
| Updated on: Jun 13, 2025 | 6:45 PM

माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू हे आंदोलना करत आहेत. अशातच आता मराठा आरक्षणासाठी सरकारला घेरणारे मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.

मनोज जरांगेंचा बच्चू कडू यांना पाठिबा 

प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिलेला आहे. यानंतर बोलताना जरांगे यांनी म्हटले की, ‘बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभरामध्ये 15 जूनला चक्काजाम आंदोलन करण्याचा ठरलं आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला शांततेत पाठिंबा द्यावा.’

मनोज जरांगेंची आंदोलनाची घोषणा

पुढे बोलताना जरांगे यांनी म्हटले की, ‘पैठण फाटा, शहागड येथे आमच चक्काजाम आंदोलन ठरलं आहे. या आंदोलनात जात-पात धर्म सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावं.शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवस शांततेत सगळ्यांनी रस्त्यावर यावं’ असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

याआधी 11 जून रोजी मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यावेळी जरांगे यांनी बच्चू कडू यांना तब्ब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी जरांगे यांनी म्हटले होते की, ‘शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे गोरगरीबांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. एखाद्या विषयाला न्याय मिळवायचा असला तर रस्त्यावर उतरावं लागतं. बच्चू कडू यांच्या मागण्यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जात-पात न पाहता रस्त्यावर उतरायला हवं.’