तरुणीला मेसेज करून जंगलात लपला, पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून नराधमाला पकडला; नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्वेतील २१ वर्षीय तरुणीला सतत त्रास देणाऱ्या आणि दोन वर्षांपूर्वी तिचा विनयभंग करणाऱ्या गणेश अल्पतराव नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून त्याला मुरबाडच्या जंगलातून पकडले.

तरुणीला मेसेज करून जंगलात लपला, पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून नराधमाला पकडला; नेमकं काय घडलं?
badlapur east police station
| Updated on: May 02, 2025 | 4:59 PM

बदलापूर पूर्वेतील एका २१ वर्षीय तरुणीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या आणि दोन वर्षांपूर्वी तिचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश अल्पतराव असे या आरोपीचे नाव असून तो मुरबाडमधील रहिवाशी आहे. बदलापूर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक अनोखी युक्ती केली आणि तो अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बदलापूर पूर्वेत राहते. दोन वर्षांपूर्वी गणेशने तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाली होती. मात्र, त्यानंतरही गणेशने तरुणीचा पिच्छा सोडला नव्हता. तो तिला वारंवार मेसेज करून धमक्या देत होता. “तुला घ्यायला मी इनोव्हा गाडी पाठवतो, त्यात बसून माझ्याकडे ये, अन्यथा ओम्नी गाडी पाठवावी लागेल,” अशा आशयाचे धमकीचे मेसेज तो तिला पाठवत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने पुन्हा एकदा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर बदलापूर पोलिसांनी त्वरित यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. बदलापूर पोलिसांनी गणेशचा ठिकठिकाणी शोध घेतला. मात्र तो फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याचे समजताच गणेश मुरबाडच्या जंगलात फरार झाला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी त्याला पकडण्यासाठी खास योजना आखली.

पोलिसांनी आदिवासी वेशभूषा केली अन्…

यावेळी पोलिसांनी आदिवासी वेशभूषा केली. ते जंगलात गेले. त्यांनी गणेशला शोधून काढले. सुरुवातीला त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली. तोच गणेश अल्पतराव असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली.

पीडित तरुणीला मोठा दिलासा

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे, ASI राजाराम कुकले, हवालदार कृष्णा पाटोळे, विजय गिरीगोसावी आणि कॉन्स्टेबल महादेव पिसे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे पीडित तरुणीला मोठा दिलासा मिळाला आहे.