3 वर्षांपूर्वीचा पत्नीचा खून, एक चूक अन् पतीचा गेम खल्लास, बदलापूरमधील तो प्लॅन्ड मर्डर कसा घडला?

बदलापूर पोलिसांनी ३ वर्षांपूर्वीच्या हत्येचे गूढ उकलले. रूपेश आंबेरकर याने आपल्या पत्नी निरजाला विषारी सर्पदंश देऊन ठार केले आणि तिचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाल्याचा बनाव केला होता.

3 वर्षांपूर्वीचा पत्नीचा खून, एक चूक अन् पतीचा गेम खल्लास, बदलापूरमधील तो प्लॅन्ड मर्डर कसा घडला?
Badlapur snake bite murder
| Updated on: Dec 14, 2025 | 9:05 AM

बदलापूर शहरात ब्रेन हॅमरेजमुळे ३ वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याची नोंद असलेल्या एका महिलेच्या मृत्यूप्रकरणाचे गूढ अखेर उकलले आहे. तिच्या पतीनेच आपल्या तीन मित्रांच्या मदतीने विषारी सर्पदंश देऊन तिला ठार मारल्याचे भीषण कृत्य समोर आले आहे. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी तपास करून मुख्य आरोपी पतीसह सर्पमित्राला आणि अन्य दोघांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्वेकडील एका इमारतीमध्ये निरजा आंबेरकर या त्यांच्या पतीसह राहत होत्या. निरजा यांचा १० जुलै २०२२ रोजी मृत्यू झाला होता. पती रूपेश आंबेरकर याने पत्नीचा मृत्यू नैसर्गिकरित्या म्हणजेच ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी या माहितीच्या आधारे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यामुळे हे प्रकरण तात्पुरते बंद झाले होते.

मात्र या गुन्ह्याला नाट्यमय वळण तेव्हा मिळाले जेव्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये ऋषिकेश चाळके या आरोपीला अटक केली. इतर गुन्ह्यांची चौकशी करताना ऋषिकेश चाळकेने पोलिसांसमोर निरजा आंबेरकर यांच्या मृत्यूचे सत्य उघड केले.

यावेळी ऋषिकेश चाळकेने चौकशीदरम्यान रूपेश आंबेरकरने निरजाला संपवण्यासाठी सर्पदंशाचा वापर केला होता. मी त्या कटामध्ये सहभागी होतो. ऋषिकेशच्या कबुलीनुसार निरजाचा पती रूपेश आंबेरकर याने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी खालील तिघांना सामील केले होते. यात पती रुपेश आंबेरकर, मित्र कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे, ऋषिकेश चाळके या चौघांचा समावेश होता.

निरजाचा मृत्यू नेमका कसा झाला?

ऋषिकेश चाळके याने दिलेल्या माहितीनुसार, रूपेश आंबेरकरने निरजाच्या हत्येसाठी आपले मित्र कुणाल चौधरी आणि सर्पमित्र चेतन दुधाणे यांच्यासह ऋषिकेश चाळके यांना घरी बोलावले. हत्येपूर्वी रूपेशने पत्नी निरजाला पायाला मालिश करण्याचा बहाणा केला. त्यावेळी सर्पमित्र चेतन दुधाणे याने एका बरणीतून विषारी साप बाहेर काढला. तो ऋषिकेश चाळकेच्या ताब्यात दिला. मालिश करण्याच्या बहाण्याने निरजा यांच्या पायावर तीन वेळा सर्पदंश घडवून आणण्यात आला, ज्यामुळे विष शरीरात पसरून त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या केल्यानंतर त्यांनी हा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचा खोटा बनाव केला. जेणेकरून पोलिसांना हा नैसर्गिक मृत्यू वाटेल आणि गुन्ह्याचा पर्दाफाश होणार नाही.

ऋषिकेश चाळकेच्या जबाबाच्या आधारे बदलापूर पोलिसांनी तातडीने तपासाची गती वाढवली. अनेक महिन्यांपूर्वी बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले. त्यांनी ठोस पुराव्यांच्या आधारे रूपेश आंबेरकरसह तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सध्या पोलीस रूपेश आंबेरकरने आपल्या पत्नीची हत्या करण्याचे हे क्रूर पाऊल नेमके कोणत्या कारणांमुळे उचलले याचा तपास करत आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याबद्दलही पोलीस कसून तपास करत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्याची उकल झाल्याने बदलापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.