भटक्या कुत्र्याच्या भीतीने पळाला; 18 वर्षीय तरुणासोबत वाटेतच भयंकर घडलं, बदलापुरात शोककळा
बदलापुरात 18 वर्षांच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. भटक्या कुत्र्याला घाबरून पळताना तरुणाचा जीव गेला. या घटनेने बदलापुरात खळबळ उडाली आहे.

मयुरेश जाधव, प्रतिनिधी : बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भटक्या कुत्र्यापासून बचाव करून पळणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. एकीकडे बदलापूर नगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आलीय. 18 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने बदलापूरकर हळहळ व्यक्त करत आहेत.
हर्षल शिंदे असं तरुणाचे नाव आहे. हर्षल हा त्याच्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्राला सोडण्यासाठी गेला होता. याच दरम्यान एक महिला भटक्या कुत्र्यांना तिथे अन्न खाऊ घालत होती, अस सांगितले जातंय. यावेळी तिथूनच जाणाऱ्या हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे तेथीलच एक भटका कुत्रा मागे लागला. हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. परंतु याच वेळी पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे पालिकेच्या उपायोजना केवळ कागदावरच आहेत का? असा सवाल विचारत संताप व्यक्त करण्यात येतोय.
बदलापुरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, बदलापुरात भटक्या कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रितिका करोचिया या मुलीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाला होता. रितिका ही चिमुरडी घराच्या मागे मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी तिला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. रेबीजचे दोन इंजेक्शनचा कोर्स झाल्यानंतरही रितिकाची तब्येत बिघडली होती. त्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रितिकानंतर आता 18 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून बदलापूर नगरपरिषदेला कधी जाग येणार, असा सवाल केला जात आहे. भटक्या कुत्र्याने आणखी एकाचा बळी घेतल्यानंतर बदलापूर नगरपरिषद काय अॅक्शन घेते, हे पाहावे लागेल.