शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर बाबांचा अखेर माफीनामा; म्हणाले, माझं वक्तव्य…
Bageshwar Baba Apology : बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आता त्यांनी माफी मागितली आहे.

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते की, ‘छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा.’ यानंतर आता बागेश्वर बाबांनी माफी मागितली आहे.
बागेश्वर बाबांनी मागितली माफी
शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना बागेश्वर बाबांनी म्हटले की, माझे वक्तव्य वेगळ्या पद्धतीनं दाखवलं जातं आहे. मला याच दुख आणि खेद आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आम्ही शिवरायांची निंदा ऐकू शकतं नाही. आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत. गुरू महिमासाठी मी ते वक्तव्य केलेलं होतं. माझ्या वक्तव्यांनी कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे.
मनोज जरांगेंनी काय म्हटलं होतं?
बागेश्वर बाबांच्या या विधानानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला होता. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते की, ’शिवरायांचा अपमान भाजप सरकारच घडवून आणतंय की काय अशी शंका यायला लागली आहे. एखाद्या वेळेस आता यांना फटकावलं पण पाहिजे, आता फक्त कमेंट करून, निषेध करून आणि सोशल मीडियावरच बोलून चालणार नाही. आता हे झोडावेच लागणार आहेत मग आता शांत बसून नाही चालणार. छत्रपतींचा जर हे अवमान करत असतील तर झोडावंच लागेल. केस होईला याला कधीपर्यंत भ्यायचं? भाजप सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे लोकं थांबवले नाहीत तर एकदा झोडाझोडी होणारच आहे. गुन्हा दाखल करून काहीच होणार नाही, यांना फटके दिले तरच हे थांबणार आहेत, यांना दुसरा पर्यायच नाही.’
अभिनेता रितेश देशमुखनेही बागेश्वर बाबांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारचा कोणताही उल्लेख इतिहासात नाही असं विधान केलं होतं.