नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा; भुजबळांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना सूचना

| Updated on: Feb 14, 2021 | 10:32 PM

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा; भुजबळांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना सूचना
Chhagan Bhujbal
Follow us on

नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. (Be ready to contest Nashik Municipal Corporation elections Independently : Chhagan Bhujbal)

छगन भुजबळ म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असून संघटना अधिक बळकट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे. सामाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत पोहचून त्याच्या समस्या जाणून घ्या. पक्षाच्या वतीने केलेली विकास कामे नागरिकांपर्यंत पोहचवावी. कुठलाही नागरिक संकटात असेल तर त्यासाठी धावून जाण्याची आपली तयारी असावी. यामध्ये युवकांची भूमिका अधिक महत्वाची असून त्यांनी यासाठी सदैव तत्पर असण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात आपण नागरिकांसाठी चांगली कामे केली आहे. ती कामे यापुढील काळातही अविरत सुरु ठेवावी. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येकाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भुजबळ म्हणाले की, पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनी पुढे येऊन आपापल्या प्रभागात लोकहीताची कामे करावी. नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या आहेत. याबाबत पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील. तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही. प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कोणीही गाफील न राहता, वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट न पाहता महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांनी कोविड-19 च्या काळात शहर व परिसरात केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. तसेच नाशिकमध्ये यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, माजी आमदार अपूर्व हिरे, जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, बाळासाहेब कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, विद्यार्थी अध्यक्ष गौरव गोवर्धने, सामाजिक न्याय अध्यक्ष धनंजय निकाळे, ओबीसी सेलचे अॅड. सुरेश आव्हाड, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अमोल वाजे, कामगार अध्यक्ष धनंजय रहाणे, वाहतूक अध्यक्ष कैलास बनकर, सेवादल अध्यक्ष बाळासाहेब मते, ग्रंथालय सेलचे शंकरराव पिंगळे, नगरसेवक गजानन शेलार, नगरसेवक जगदीश पवार, नगरसेविका समीना मेमन, नगरसेविका सुषमा पगारे, माजी नगरसेविका कविता कर्डक, संजय खैरनार, विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ, बाळासाहेब गीते, सुरेखा निमसे, विभाग अध्यक्ष जीवन रायते, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, प्रशांत वाघ, महेश भामरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती उत्साहातच होणार, मराठा संघटनांचा आक्रमक पवित्रा

चिंताजनक..हिंगणघाटच्या ‘त्या’ शाळेतील कोरोनाबाधितांची शंभरी पार, अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह 23 जण RTPCRमध्ये पॉझिटिव्ह

(Be ready to contest Nashik Municipal Corporation elections Independently : Chhagan Bhujbal)