
महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बीड | 01 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षण आंदोलन सध्या पेटलं आहे. त्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. बीडमध्ये झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली गेली. धाराशिव जिल्ह्याततही संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे मराठवाड्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अशात आता तब्बल 36 तासानंतर बीड जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. बाजारपेठासह सर्व कार्यालय आज सुरु राहतील. इंटरनेट सुविधा मात्र अनिश्चित काळासाठी बंद राहील. धाराशिव जिल्ह्यात मात्र आज दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम असणार आहे.
तोडफोड आणि जाळपोळीनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. 36 तासात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याने संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पण जमावबंदीचा आदेश मात्र कायम राहणार आहे. 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
बीड जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा अजूनही बंद आहे. जिल्ह्यातील संचारबंदी उठवली असली तरी बससेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. बसेसची प्रचंड प्रमाणात तोडफोड झाल्यामुळे अनेक बसेसचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवली आहे.
धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी आजही संचारबंदी आदेश लागू असणार आहे. काल धाराशिव जिल्ह्यात संचारबंदीला झुगारून मराठा आंदोलकांनी आक्रमक आंदोलन केलं. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र ती नियंत्रणात आहे. संचार बंदी आदेश लागू असतानाही अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले. रेल्वे रोको, शासकीय कार्यालयाना टाळे, टायर जाळून राष्ट्रीय महामार्ग अडवला. तर कँडल मार्च, साखळी उपोषण सुरूच आहेत.
आज शाळा, बस, बाजारपेठ बंद असणार असुन शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 450 बसच्या 1 हजार 450 बस फेऱ्या रद्द केल्याने एसटी मंडळाला 50 लाखाचा फटका बसला आहे. आक्रमक आंदोलक रास्ता रोको, बस फोडणाऱ्या जवळपास 180 आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले यांच्या घरांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे.
जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुहागन इथं सकल मराठा समाजाकडून उपोषण सुरू करण्यात आलं आहे. जरांगे पाटलांच्या उपोषण सुरवसेपर्यंत हा उपोषण चालणार असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.