
गेल्या दोन दिवसांपासून बीड, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने बीड जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी, सिंदफना आणि मांजरा या प्रमुख नद्यांना पूर आल्याने अनेक भागांतील गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः परळी, माजलगाव आणि गेवराई तालुक्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सध्या NDRF कडून बचाव कार्य सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी घाबरू नका,खचून जाऊ नका, असे आवाहन बीडमधील जनतेला केले आहे.
जायकवाडी धरणाचे नऊ आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परळी तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पोहनेर ते पाथरीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी तुम्ही घाबरून राहू नका, मनोबल हरू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. उगीच वाहत्या पाण्यामध्ये गाडी घालू नका, उगीच पोहायचा प्रयत्न करू नका. जिथे आहेत तिथेच जीव मुठीत धरून थांबा, असे म्हटले आहे.
माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे गोदावरी नदीच्या काठावर एका घरात एक गरोदर महिला पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. ही माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. तिला पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यातही सिंदफना नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. नांदुर हवेलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने या भागातील संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात 36 लोक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बचाव कार्यात 18 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर रात्री उशिरा पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उर्वरित लोकांनाही सुरक्षित बाहेर काढले. या पुरामुळे या परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या NDRF ची एक तुकडी गेवराईत तळ ठोकून असून, संभाव्य धोक्यावर लक्ष ठेवून आहे. बीड जिल्ह्यातील तिन्ही नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. यामुळे जिल्हा प्रशासन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे.