महिलेच्या प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया, डॉक्टर पोटातच हातमोजे, रुमाल विसरला, बीडमध्ये धक्कादायक प्रकार !
बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर एका 19 वर्षीय महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली असून पुण्यातील ससून रुग्णालयात तिच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली. कुटुंबीयांनी वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप केला असून, या प्रकरणी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 19 वर्षांच्या महिलेला प्रचंड त्रास सुरू झाला. मात्र तिची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला. कारण तपासणीत सिझर ऑपरेशनंतर त्या महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिले होते, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून रुग्णालयच्या हलगर्जीपणामुळे चांगलाच संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या गायकवाड असं पीडित महिलेचं नाव आहे. 1 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर सिझर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला. प्रकृती खूप बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली, त्या दरम्यान त्यांच्या पोटातून हातमोजे आणि कागदी रुमाल काढण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून नवजात बाळाला कुशीत घेण्यापूर्वीच त्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
महिलेच्या आईने काय सांगितलं ?
दरम्यान त्या महिलेच्या आईने सगळा घटनाक्रम सांगितला. माझी मुलगी संध्या हिला मी 1 तारखेला तिला बीडच्या रुग्णालयात घेऊन गेले, तिथेच तिचं सीझर ऑपरेशन झालं. मात्र दोन -तीन दिवसांनी तिला त्रास सुरू झाला, उलट्या झाल्या. मी याबद्दल डॉक्टराना सांगितलं, तर तिला पित्त झालं असेल, असं तिथले डॉक्टर म्हणाले, असं पीडितेच्या आईने सांगितलं. जे औषध सांगितलं ते मी घेऊन आले, तिला ते देण्यात आलं, मात्र तरीही तिला काही फरक पडत नव्हता. तो प्रकार डॉक्टरांना पुन्हा सांगितला, त्यांनी नर्स पाठवली, पण इंजेक्शन बसत नाही, मग त्या निघून गेल्या. माझ्या मुलीला प्रचंड त्रास व्हायला लागला, म्हणून मी पुन्हा बोलवायला गेले, तर त्यांनी सांगितलं की डिस्चार्ज झालाय, तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता, असं त्यांनी नमूद केलं.
घरी आल्यावर तिला जास्तच त्रास झाला म्हणून खाजगी रुग्णालयात नेऊन तपासलं, तिथे कळलं की इन्फेक्शन झालंय. तिथला ऑपरेशनचा खर्च खूप सांगितला होता, म्हणून आम्ही मुलीला घेऊन दिनानाथला गेलो, तिथेही तिला घेतलं नाही. बऱ्याच ठिकाणी विचारून, अखेर आम्ही तिला घेऊन ससूनला गेलो, तोपर्यंत इन्फेक्शन खूप झालं होतं, त्यांनी ऑपरेशनबद्दल सांगितलं. मात्र ऑपरेशन केल्यावर तिच्या पोटात काय होतं, ते आम्हाला कळलं. तिच्या पोटातून ग्लोव्ह्ज आणि टिश्यू पेपर निघाला, असा आरोप तिच्या आईने केला. अजून माझी मुलगी आयसीयूमध्ये आहे, असं म्हणताना ती माऊली भावविवश झाली होती.
काय म्हणाले शल्यचिकित्सक ?
या प्रकरणावर बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या गायकवाड यांना 1 ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर तीन ते चार दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर त्यांच्या पोटात दुखत असल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली. त्यानंतर खासगी डॉक्टरांकडे तपासणी करण्यात आली. सोनोग्राफीमध्ये त्यांच्या पोटात काहीतरी असल्याचे आढळून आल्याची माहिती संबंधित खासगी डॉक्टरांनी आपल्याला दिल्याचे सोळंके यांनी सांगितले.
पोटातील वस्तू काढण्यासाठी त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, नातेवाईकांना त्यांच्यावर बीडमध्ये उपचार न करता पुण्याला घेऊन जायचे असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 12 किंवा 13 ऑगस्ट रोजी संध्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पोटातील वस्तू बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाल्याचेही सोळंके यांनी सांगितले. सध्या रुग्णाची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची दखल घेत संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. अद्याप नातेवाईकांकडून अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.