वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण कशामुळे झाली? सुरेश धस यांनी सांगितली Inside स्टोरी

बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जेलमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून, महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण कशामुळे झाली? सुरेश धस यांनी सांगितली Inside स्टोरी
walmik karad suresh dhas
| Updated on: Mar 31, 2025 | 1:15 PM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई केली जात आहे. त्यांना बीडच्या कारागृहात कैद करण्यात आले आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. आता याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी टीव्ही 9 मराठीने सुरेश धस यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुरुंगात नेमकं काय घडलं? त्यांच्या झटापट कोणत्या कारणामुळे झाली? तसेच त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले जाणार का? याबद्दलची सर्व माहिती दिली.

“कोणत्याही वस्तूने मारण्यात आलेले नाही”

“मला या प्रकरणाची माहिती आहे. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केलेली आहे. महादेव गिते याला अटक होण्यापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. मला खोट्या गुन्ह्यात कसं गुंतवलं हे सांगून मग तो जेलमध्ये गेला आहे. इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, कोणाला खोट्या प्रकरणात अडकवायचं, अशा सर्व प्रकरणामुळे त्यांना मारहाण झाली असेल. त्यांच्यात झटापट झाली. फक्त मारहाण झालेली आहे. कोणत्याही वस्तूने मारण्यात आलेले नाही”, असे सुरेश धस म्हणाले.

“रुग्णालयात वैगरे दाखल करण्याची गरज नाही”

“वाल्मिक कराड ज्यांना शत्रू समजतात ते बबन गिते आणि हे सर्व त्यांचेच समर्थक आहेत. महादेव गिते याला बापू आंधळेच्या प्रकरणी गोवण्यात आलेले आहे. त्याचा सहभाग आहे की नाही हे तपासात समोर येईल. त्याने स्वत: सांगितलेलं की माझा या प्रकरणाशी काहीही सहभाग नाही. विनाकारण मला गोवण्यात आले. बबन गिते यांनाही अडकवण्यात येत होतं. घटना ८.३० ला झाली आणि तक्रार करताना ७ ची वेळ दाखवली. ते केल्याशिवाय बबन गिते यात अडकत नव्हता”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

“वाल्मिक कराडला रुग्णालयात वैगरे दाखल करणार नाही. त्याला फक्त दोन कानशि‍लात लगावण्यात आल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये हलवलेलं चांगलं होईल. पुढे मारहाण होईल की नाही, या शक्यतेपेक्षा ही घटना घडली हे महत्त्वाचं आहे”, अशीही मागणी सुरेश धस यांनी केली.