
Beed Masjid Blast : बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत हा स्फोट झाला. गुढी पाडवा, ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकाने स्फोटापूर्वी सोशल मीडियावर जिलेटीनसह स्वत:चा व्हिडिओ पोस्ट केला होता.
अर्धमसला येथील स्फोटा प्रकरणात विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांचे व्हिडिओ समोर आले आहे. स्फोटामुळे मशिदीच्या भीतींना तडे गेली आहेत. खिडक्यांची काचेही फुटली आहे. स्फोट झाल्यानंतर सय्यद उस्मान या व्यक्तीने विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांना पळून जाताना पाहिले होते.
विजय गव्हाणे याने सोशल मीडियावर जिलेटीनसोबत स्वत:चा व्हिडिओ पोस्ट केला. स्फोटाच्या आधीच्या रात्री गावात उरस होतो. त्यावेळी दोघांनी शिविगाळ केली होती. गावातील लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. उरुस संपल्यानंतर सर्व जण घरी गेले होते. त्यानंतर रात्री अडीच वाजता स्फोटाचा आवाज आला. त्या आवाजाने लोक जागे झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्वरीत घटनास्थळी आले. यावेळी लोकांनी दोन आरोपींना पाहिले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
आरोपींजवळ आठ ते दहा जिलेटीनच्या कांड्या होत्या. स्फोटाची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी दोन-तीन तासांत आरोपीला पकडले. एका माथेफिरु व्यक्तीच्या कृत्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग करु नका. आपले एकता कायम ठेवा. आज आणि उद्या सण आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटक म्हणून खाणकामच्या ठिकाणी केला जातो. विशेषता: विहिरी खोदने, रस्ते किंवा इतर कामांदरम्यान अडथळा ठरणारे मोठमोठे दगड किंवा खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो.