संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ पुन्हा आक्रमक, थेट सरकारला इशारा

मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन महिने उलटले असतानाही मुख्य आरोपी फरार आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, २४ फेब्रुवारीपासून दोन दिवस अन्नत्याग आणि त्यानंतर पाण्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पोलिसांवर व अन्य आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने दखल घेतली तर आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ पुन्हा आक्रमक, थेट सरकारला इशारा
santosh deshmukh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2025 | 10:45 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, यांसह अन्य मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचे उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. जर दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच शिष्टमंडळाने दखल घेतली तर आंदोलन मागे घेऊ, असेही गावकऱ्यांनी सांगितले आहे.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण गाव बसणार आहे. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल. दोन दिवस आम्ही अन्नत्याग करणार आहोत. तिसऱ्या दिवसापासून आम्ही पाण्याचा त्याग करणार आहोत, असा आक्रमक पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया काय?

याबद्दल धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. SP साहेबांसोबत चर्चा झाली ती सकारात्मक होती. काही गोष्टी त्यांच्यापर्यंत गेल्या नाहीत. पुन्हा चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच अर्ज देणार आहोत. गावकऱ्यांनी जो अन्नत्यागाचा पावित्रा घेतला आहे त्याच्याशी मी सहमत आहे. जोपर्यंत शिष्टमंडळ येत नाही आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू असेल, असे धनंजय देशमुख म्हणाले.

“तिसऱ्या दिवसापासून आम्ही पाण्याचा त्याग करणार”

तर गावकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली. “ज्यांना आम्ही सह आरोपी म्हणतो, ज्यांच्या बाबतीत सबळ पुरावे आहेत त्यांना आरोपी का करत नाहीत, असा सवाल गावकऱ्यांनी केला. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार. अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण गाव बसणार आहे. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. दोन दिवस आम्ही अन्नत्याग करणार आहोत तिसऱ्या दिवसापासून आम्ही पाण्याचा त्याग करणार आहोत”, असेही गावकरी म्हणाले.

“आम्ही आंदोलन केले की कारवाई केली आणि त्या कारवाईत आरोपी हजर झाले. केज पोलीस स्टेशन ने 6 तारखेपासून नऊ तारखेपर्यंत एकही रिपोर्ट CID कडे दिला नाही. आज गावाचं सगळ्यात जास्त नुकसान केज पोलिसांनी केलं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री साहेब शिष्टमंडळ पाठवतील, मंत्रालयात कोणी नाही का? नाहीतर चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील ते साहेबांना म्हटले त्यांनी त्यातून बाहेर निघावं. जाणीवपूर्वक मराठ्याच्या माणसाचं खच्चीकरण केलं जात आहे”, असाही आरोप ग्रामस्थांनी केला.

अन्नत्याग आंदोलनाच्या सात प्रमुख मागण्या काय?

1)केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन व PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करा.
2)फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा
3)सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करावी.
4)सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणे.
5)वाशी पोलीस स्टेशनचे PSI घुले, पो.कॉ. दिलीप गित्ते, गोरख व दत्ता बिक्कड, हेड कॉ. यांचे CDR तपासून यांना सहआरोपी करा.
6)आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करावे.
7)घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णाण्यात नेण्याऐवजी PSI राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्यात यावी.