दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्याने खासदार प्रितम मुंडे अडचणीत?

बीड : भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. परळी तालुक्यातील नाथ्रा या त्यांच्या मूळ गावी प्रितम मुंडे मतदान करतात. मात्र मुंबईतील वरळी येथेही त्यांचं मतदार यादीत नाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप …

दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्याने खासदार प्रितम मुंडे अडचणीत?

बीड : भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. परळी तालुक्यातील नाथ्रा या त्यांच्या मूळ गावी प्रितम मुंडे मतदान करतात. मात्र मुंबईतील वरळी येथेही त्यांचं मतदार यादीत नाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाणही करण्यात आली. त्यामुळे बीड जिल्ह्यात हे प्रकरण आता चांगलंच पेटलंय.

2014 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत प्रितम मुंडे या देशातून सर्वाधिक मते घेऊन निवडून आल्या होत्या. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. मुंडे साहेबांच्या अपघाती निधनामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली आणि याच सहानुभूतीमुळे बीड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रितम मुंडे यांना मतदान करून एक प्रकारे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजपची युती असली तरी राष्ट्रवादी समोरासमोर निवडणूक रिंगणात उभी आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे.

भाजपचं स्पष्टीकरण

मतदार यादीतील नावाबद्दल टीव्ही 9 मराठीने उमेदवार प्रितम मुंडे आणि त्यांच्या बहीण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. त्यांच्या वकिलाने यावर स्पष्टीकरण दिलंय. दोन मतदार याद्यांमध्ये नाव असणं हा गुन्हा नाही, तर दोन ठिकाणी मतदान करणं हा गुन्हा आहे, असं त्यांनी म्हटलंय.

मारहाण करणाऱ्या आरोपींना अजून अटक नाही

भाजप उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेला 24 तास उलटूनही कुणाला अटक झालेली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दादासाहेब मुंडे यांनी दिलाय. शिवाय काँग्रेसकडूनही या तक्रारीची दखल घेऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

माहिती मागण्यासाठी आपल्याकडे आरटीआयसारखे कायदे आहेत. त्यामुळे एखाद्या उमेदवाराच्या शपथपत्रावर विरोधी उमेदवाराने किंवा विरोधी पक्षाने आक्षेप घेणं हे देखील लोकशाहीला धरुनच आहे. पण बीडमध्ये आक्षेप घेणारालाच मारहाण करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्ज वैध ठरवण्यात आला असून सध्या प्रितम मुंडे प्रचारात व्यस्त आहेत. या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *