कसलं प्रेम, कसलं मनोमिलन? दीड दिवसातच ‘धाड-धाड’ धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची ताटातूट, भर कार्यक्रमातून उठून गेले…

| Updated on: Apr 13, 2023 | 4:06 PM

'वरून आदेश' आला म्हणून पंकजांच्या कारखान्यावर धाड पडली तर धनंजय मुंडेदेखील असे एकाएकी कार्यक्रमातून उठून गेले, यामागेही असाच एखादा आदेश असावा, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

कसलं प्रेम, कसलं मनोमिलन? दीड दिवसातच धाड-धाड धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची ताटातूट, भर कार्यक्रमातून उठून गेले...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महेंद्रकुमार मुधोळकर, बीड : मराठवाडाच (Marathwada) नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा खिळवून ठेवणारा एक सोहळा 11 एप्रिल रोजी सर्वांनी अनुभवला. कार्यक्रम तसा धार्मिक-आध्यात्मिक होता. मराठवाड्यातले दोन दिग्गज, धनंजय मुंडे (Dhananjay Munde)- पंकजा मुंडे (Pankaja Munde). हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर आले. भगवानगडाच्या पायथ्याशी. भारजवादी गावातील नारळी सप्ताहाचा कार्यक्रम होता. विशेष म्हणजे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात नाराजीनाट्य रंगलं होतं, तेही संपल्यासारखं वाटलं.

तब्बल 7 वर्षानंतर नामदेवशास्त्रीदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. ऊसतोड कामगार आणि इथल्या समाजासाठी भाऊ-बहीण एकत्र आले, समाजासाठी आम्ही राजकीय वैर बाजूला ठेवल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. तर भगवान गडाविषयी बोलले तर मान कापून ठेवीन, असा शब्द पंकजा मुंडे यांनी दिला. हा क्षण पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या.

भाऊ-बहीणीचं मनोमिलन?

11 एप्रिलचा कार्यक्रम पाहून राजकारणात एकच चर्चा सुरु झाली. बीडमधील भावा-बहिणींचं मनोमिलन आता काही दिवसांवर येऊन ठेपलंय.. राजकीय समीकरणं, आकडे जुळवून पाहिले गेले. मराठवाड्यातील जनतेच्या अपेक्षाही उंचावल्या, पण पुढच्याच दिवशी धाड-धाड… घडलं…

धाड-धाड काय घडलं?

दिवस 13 एप्रिल. स्थळ बीड. शिरूर तालुका. गाव मानूर. नारळी सप्ताहानिमित्त पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले. कार्यक्रम सुरु होता. हार-तुरे, सत्कार समारंभ झाला. उपस्थितांची भाषणं सुरु होणार इतक्यात धनंजय मुंडे यांनी अचानक कार्यक्रमातून एक्झिट घेतली. मला काहीतरी अर्जंट मीटिंग आल्याचं सांगितलं. तोपर्यंत इकडे माध्यमांवरून पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीची धाड पडल्याच्या बातम्या झळकल्या. पंकजा मुंडे यांनाही फोनवरूनच ही माहिती कळाली.

इकडे माध्यमांवर ब्रेकिंग न्यूज सुरु होती तर धनंजय मुंडे भर कार्यक्रमातून निघून गेले. पंकजा मुंडे यांनीही कारखान्यावरील अशा प्रकारे रेड पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. आम्ही जीएसटी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असून जीएसटीच्या पैशांचा आमचा अंतर्गत वाद होता. तो पैसा आम्ही काही दिवसात भरणारच होतो. पण या गोष्टी मला अशा प्रकारे उघड कराव्या लागतील, याची कल्पना नव्हती. विशेष म्हणजे जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी ‘वरून आदेश’ आल्याचं म्हटलं. तिथूनच या धाडीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

11 एप्रिलचा एक दिवस, मुंडे भावा-बहिणींच्या मनोमिलनाच्या अपेक्षांनी भारलेला होता. तर 13 एप्रिलचा सकाळी सुरु झालेला आणखी एक कार्यक्रम. दुपारी 12 वाजेपर्यंत भावा-बहिणींसमोर काय प्रसंग उभे टाकले. यावरून अनेक आडाखे बांधले जात आहेत. ‘वरून आदेश’ आला म्हणून पंकजांच्या कारखान्यावर धाड पडली तर धनंजय मुंडेदेखील असे एकाएकी कार्यक्रमातून उठून गेले, यामागेही असाच एखादा आदेश असावा. पंकजा मुंडे म्हणाल्या ते पुन्हा एकदा सिद्ध झालं की काय.. आम्ही एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत…