परळी वैद्यनाथ मंदिराबाहेरील भिकाऱ्याला पोलिसात देवाचे दर्शन, चोरीचे पावणेदोन लाख तासांत सापडले

| Updated on: May 25, 2021 | 1:45 PM

बीड जिल्ह्यातील परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याची 1 लाख 72 हजारांची रक्कम चोरीला गेली (Parali Beggar cash stolen)

परळी वैद्यनाथ मंदिराबाहेरील भिकाऱ्याला पोलिसात देवाचे दर्शन, चोरीचे पावणेदोन लाख तासांत सापडले
परळीतील भिकाऱ्याची चोरीला गेलेली रक्कम
Follow us on

परळी (बीड) : परळी वैद्यनाथ मंदिराबाहेरील भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला देवाने पोलिसाच्या रुपाने हात दिला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आयुष्यभर भीक मागून जमवलेल्या जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या काही तासात भिकाऱ्याची चोरीला गेलेली रक्कम त्याला परत केली. (Beed Parali Vaidyanath Temple Beggar Baburao Naikwade 1.72 lakh rupees cash stolen Police finds thief)

वैद्यनाथ मंदिर परिसरातील भिकारी

बीड जिल्ह्यातील परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याची 1 लाख 72 हजारांची रक्कम चोरीला गेली होती. बाबुराव नाईकवाडे हे मागील अनेक वर्षांपासून वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत. नाईकवाडे यांनी आयुष्यभर पै पै जमा करुन 1 लाख 72 हजारांची रक्कम साठवली होती.

आयुष्यभराची पुंजी चोरीला

बाबुराव नाईकवाडे यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्याने ही रक्कम लंपास केली. आधीच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे अनेक भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाईकवाडे यांनाही याचा फटका बसला. त्यातच आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्यामुळे नाईकवाडे चिंताग्रस्त झाले होते.

पावणे दोन लाखांची रक्कम परत

बाबुराव नाईकवाडे यांनी हवालदिल होऊन परळी पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत तपास केला. त्यानंतर नाईकवाडे यांची चोरीला गेलेली जवळपास पावणे दोन लाख रुपयांची रक्कम अवघ्या काही तासातच त्यांना मिळवून दिली. त्यामुळे पोलिसांच्या तपास कार्याचं कौतुक होत आहे. (Parali Beggar cash stolen)

भिकाऱ्याकडील रकमेची परळीत चर्चा

एकीकडे कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत एका भिकाऱ्याकडे मात्र एवढी मोठी रक्कम मिळून आल्याने आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. भिकाऱ्याकडे झालेली चोरी आणि पोलिसांनी धावून जात त्याला केलेली मदत हा मात्र सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

संबंधित बातम्या :

भिकारी महिलेच्या बँक खात्यात 1 कोटी 42 लाखाची रोकड, तब्बल 5 घरांची मालकी

भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाक

(Beed Parali Vaidyanath Temple Beggar Baburao Naikwade 1.72 lakh rupees cash stolen Police finds thief)