Beed | ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’, बीडमध्ये सात एचआयव्ही बाधित जोडप्यांचा शुभविवाह, जिल्हा प्रशासनाने केले कन्यादान..!

| Updated on: May 24, 2022 | 11:59 AM

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी कन्यादान केले.

Beed | साथ जियेंगे, साथ मरेंगे, बीडमध्ये सात एचआयव्ही बाधित जोडप्यांचा शुभविवाह, जिल्हा प्रशासनाने केले कन्यादान..!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. अनेक सामाजिक संस्था अशा व्यक्तींसाठी झटत असतात. पण जिल्हा प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेत या व्यक्तींसंदर्भात कौतुकास्पद उपक्रम राबवण्याचे फार कमी वेळेच ऐकिवात येते. बीडमध्ये असाच एक स्तुत्य उपक्रम पार पडला. एचआयव्हीग्रस्त (HIV)
बीडमध्ये (Beed) मात्र अशा सात  जोडप्यांना एकत्र आणून जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी  सामूहिक विवाह सोहळा (Mass Wedding) घडवून आणलाय.  त्यामुळे व्यथित होऊन  निराशामय जीवन जगणाऱ्या  एचआयव्हीग्रस्तांना कायमस्वरूपी आधार मिळालाय. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी कन्यादान केले. सुनील लांजेवार यांनी मणी मंगळसूत्र देऊन सामाजिक जबाबदारी पार पडली तर अजित पवार यांनी संसारउपयोगी साहित्य दिले.

बीडमध्ये मंगलमय वातावरणात विवाहसोहळा

वधू वरांच्या आत धरलेला अंतरपाठ, मंत्र पाठिका म्हणणारे पुरोहित, साक्षीला असलेले सर्व आप्तेगण आणि जिल्हाप्रशासन…  असं चित्र बीडमधील या विशेष लग्नाच्या ठिकाणी होतं. सातही जोडपे एचआयव्ही बाधित आहेत. दुर्धर संसर्गानंतर जीवनात निराश न होता जातीच्या उतरंडी ओलांडून शेकडो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने एका नवीन जीवनाला
या जोडप्यानं सुरुवात केली आहे. हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने नवीन जोडीदारासोबत आनंदी जीवन जगण्याची उमेद घेऊन या नव विवाहित दाम्पत्यांनी वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. हेल्थ केअर कमुनिटी ऑफ पॉझिटिव्ह पिपल्सच्या विहान प्रकल्पाने ‘जुळून येती रेशीमगाठी’ अंतर्गत हा सोहळा घडवून आणलाय.

सर्वधर्मीय विवाह सोहळा

सर्वधर्मीय अशा या विवाह सोहळ्यात जातीच्या सीमा ओलांडून वधुवर सहभागी झाले होते. जीवघेण्या आजाराने बाधित असलो तरी जगण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा नवदाम्पत्यात कायम होता. दरम्यान यावेळी ‘जात’ तर त्यांच्या मनालाही शिवत नव्हती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा अनोखा विवाह पार पडला.  नवदाम्पत्याना शुभेच्छा म्हणून  जिल्हा प्रशासन आणि वऱ्हाडी मंडळींनीही त्यांच्या नवजीवनासाठी संसारउपयोगी साहित्य देऊन त्यांना जगण्याची उमेद दिली आहे.  एचआयव्ही सारख्या दुर्धर आजारातून जाताना समाजानेही दुजाभाव करू नये. असा संदेश या विवाह सोहळ्यातून देण्यात आला.

अप्पर पोलीस अधीक्षकांनी केले कन्यादान…

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी कन्यादान केले. सुनील लांजेवार यांनी मणी मंगळसूत्र देऊन सामाजिक जबाबदारी पार पडली तर अजित पवार यांनी संसारउपयोगी साहित्य दिले. दुर्धर आजारातून जीवन जगताना या देखील जोडप्यांना आनंदी राहून संसार फुलविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजाने भेदभाव न करता अशा जोडप्यांना मायेची फुंकर घालावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यावेळी केले. कळत न कळत झालेल्या चुकीतून बऱ्याच जणांना एचआयव्ही सारख्या जीवघेण्या संसर्गाची लागण झालीय. अनेक जण या आजारामुळे खचून जातात , जीवन जगण्याची आस सोडून देतात. अशाच निराश आणि हतबल होऊन बसलेल्या या सात जोडपयांचे नव्याने रेशीमगाठी बांधल्याने त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळालीय. असा हा विवाह संकल्प राज्यभर केल्यास एचआयव्ही बाधितांना मोठा आधार मिळेल यात शंका नाही.