विलास घुले प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा फोन, रात्री नेमकं काय घडलं? बीडमधून मोठी अपडेट

Vilas Ghule Case Beed: बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन केला. केज पोलीस ठाण्यासमोर त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. मोठे आंदोलन झाले. रात्री घडलं काय?

विलास घुले प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा फोन, रात्री नेमकं काय घडलं? बीडमधून मोठी अपडेट
विलास घुले हत्या प्रकरण
| Updated on: Jun 24, 2026 | 10:59 AM

Vilas Ghule Case Beed: बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची हत्या झाली. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गेले तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. काल विलास घुले यांचा मृतदेह नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला.रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती हाके यांनी दिली. यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. यानंतर रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. तसेच या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी उपस्थित नातेवाईकांना दिले. रात्री उशिरा आंदोलन स्थगित करत विलास घुलेच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत होते. त्यानुसार आता पुरवणी जबाब घेण्यात आला असून यामध्ये चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणाचे राजकीय पडसाद जिल्ह्यात उमटत आहे. हा प्रश्न आमदार धनंजय मुंडे यांनी सुद्धा लावून धरला. त्यामुळे खासदारविरोधात आमदार यांच्या समर्थकात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

मंगळवारी कडकडीत बंद

या प्रकरणी मंगळवारी केज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. आमदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

नेमकं प्रकरण काय?

20 जून रोजी गावकरी हॉटेलचे मालक विलास घुले एक भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत होते. त्यांचा मित्र उमेश माने यांना मारहाण होत होती. घुले सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. घुले गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणात बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भय्यासाहेब गायकवाड, बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोप पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे.

Follow Us