
महेंद्रकुमार मुधोळकर, Tv9 मराठी, बीड | 14 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये पार पडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं. यावेळी आंदोलकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयाला आग लावली होती. या आगीतून संदीप क्षीरसागर यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं होतं. या घटनेनंतर आज आमदार रोहित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात क्षीरसागर कुटुंबिय आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत एकत्र दिवाळी पाडवा साजरा केला. बीडमधील नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आपण इथे आल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. या कार्यक्रमावेळी संदीप क्षीरसागर यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी त्या दिवसाच्या घटनेची आठवण सांगितली.
“मी आधीच सांगते की, आरक्षण हा विषय गंभीर आहे. मी याआधीच सांगितलं होतं की, आरक्षणाच्या विषयावरुन कुणी राजकारण करु नये. आता हे नेमकं काय आहे ते भैय्याच सांगतील. पण विचित्र फिलिंग येतेय. जी घटना घडली त्यावेळी मी स्वत: घरी होते. माझ्या सहा वर्षाचा मुलगा घरात होता. घरातील अनेक सदस्य घरात होते. कुठल्याही सामान्य माणसाला हे पटत नाही. माणुसकी कुठेतरी हरवली आहे. प्रत्येक माणसाने हा विचार करावा, अशा गोष्टी करण्याआधी थोडा तरी विचार करावा की, घरात कोण आहे की नाही, अशी घटना कुठेही घडू नये, एवढंच मला देवाला प्रार्थना करायची आहे”, अशी प्रतिक्रिया नेहा क्षीरसागर यांनी दिली.
“दिवाळीमध्ये पवार कुटुंब पहिल्यांदाच बारामती सोडून बाहेर गावी आले आहे. बीडची परिस्थिती कळली म्हणून आम्ही सर्वकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी बीडमध्ये आलो आहोत. इथली पाहणी आम्ही केली. वाईट वाटले. लोकांनी शांततेत राहावे”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार यांनी दिली. तर “घटना घडली तेव्हा आम्ही पुण्यात होतो. मला जाऊ नेहा ताई यांचा फोन आला. त्या खूप घाबरल्या होत्या. अशी घटना कोणाच्याही घरात घडू नये”, अशी प्रतिक्रिया श्रुती क्षीरसागर यांनी दिली.
आमदार रोहित पवार यांनीदेखील या प्रकरणावर माहिती दिली. “आंदोलनाची दिशाभूल करणं हे षडयंत्र सुरू आहे. संदीप भैय्या यांना दिलेला शब्द मी पाळला आहे. सर्वसमाज एकत्रित येवून दिवाळी साजरी करणे ही आपली परंपरा आहे. आणि हेच जोपासण्याचे आम्ही काम करतोय. आज बीडमध्ये दिवाळी साजरी करताना लोकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांमधला भय निघून जावे यासाठी मी बीडमध्ये आलो”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
“अजित पवार आजारी आहेत. कमीत कमी लोकांना भेटावे, असे डॉक्टरने सांगितले आहे. पण शरद पवार 83 वर्षांचे असतानादेखील ते लोकांना भेटत आहेत. डॉक्टरांनी त्यांना देखील लोकांना भेटू नये असे सांगितले होते. तरीही जनेतच्या प्रेमाखातर शरद पवार आज लोकांची भेट घेत आहेत”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी यावेळी दिली.
“बीडमध्ये जाळपोळ सुरू असताना पोलिसांनी काहीच केले नाही. सात तास पोलीस शांत बसले होते. बॉम्ब टाकत असताना पोलीस पाहत होते. उलट पोलिसांनी निरपराध लोकांवर कारवाई करत आहेत. पोलीस वातावरण गढूळ करत आहेत”, असा आरोप रोहित पवारांनी केला.
“हल्ला हा नियोजित कट होता. याचा मास्टरमाइंड पोलिसांनी लवकर पकडला पाहिजे. पोलिसांनी फुटेज गोळा केली आहेत. हे प्रकरण महाराष्ट्रापुढे आणले पाहिजे. इथला प्रत्येक मराठी माणूस कोणालाही घाबरत नाही. पैशाच्या पुढे लोकशाहीची ताकत आहे. कोरोना काळात माणुसकी जशी जपली तशी माणुसकी जपली पाहिजे”, असं मत रोहित पवारांनी मांडलं.