धनंजय मुंडे पुन्हा मंत्री? थेट दिल्ली दौऱ्यावर, कोकाटे प्रकरणानंतर मोठ्या घडामोडी; काय घडतंय?
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद कोणत्याही क्षणी जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. असे असतानाच आता धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

Dhananjay Munde : खोट्या कादपत्रांच्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील काही सदनिका लाटण्याच्या आरोपाखाली मंत्री माणिकराव कोकाटे हे दोष्टी ठवरण्यात आले आहेत. सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. या निकालानंतर आता नाशिक पोलिसांनी कोकाटे यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट जाहीर होताच कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाने कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी आता धोक्यात आले आहे. कोकाटे यांनी न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आता पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकीकडे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असतानाच मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत.
याआधीही धनंजय मुंडे झाले होते सक्रीय
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यामध्ये त्यांनी एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे? हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असतानाच धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेले असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळातील सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसून आले होते. तेव्हाही कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील धनंजय मुंडे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता धनंजय मुंडे थेट दिल्लीला गेले आहेत.
कोकाटे यांची जागा कोण घेणार?
दुसरीकडे माणिकरा कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांचे मंत्रिपद कोणत्याही क्षणी जाऊ शकते असे सांगितले जात आहे. कोकाटे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर आता शुक्रवारी (19 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. महायुतीमध्ये आता कोकाटे यांचे मंत्रिपद गेले तर त्याची जागा कोणाला द्यावी, यावरही आता चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
