डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश, हरिश्चंद्र चव्हाण म्हणतात तिकीट मलाच!

मुंबई/नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारती पवार यांच्या भाजप प्रवेशाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भारती पवार यांच्या भाजप प्रवेशानं दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. दरम्यान भारती पवारांच्या प्रवेशानं भाजपनं राष्ट्रवादी आणि भाजपमधले …

डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश, हरिश्चंद्र चव्हाण म्हणतात तिकीट मलाच!

मुंबई/नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारती पवार यांच्या भाजप प्रवेशाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भारती पवार यांच्या भाजप प्रवेशानं दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. दरम्यान भारती पवारांच्या प्रवेशानं भाजपनं राष्ट्रवादी आणि भाजपमधले प्रस्थापित यांना एकाचवेळी मोठा धक्का देण्याचं तंत्र अवलंबल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या यंग ब्रिगेडमधल्या नेत्या डॉ.भारती पवार यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या एक दशकापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपनं भाकरी फिरवल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राष्ट्रवादीला तर मोठा धक्का मिळेलच, मात्र भाजपतल्या स्वयंघोषित प्रस्थापितांना देखील यानिमित्तानं दणका देण्याचा डाव भाजपनं साधल्याची चर्चा आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्ती ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे भारती पवारांच्या निमित्तानं भाजपनं उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक मोठं घराणं गळाला लावल्याचं बोललं जात आहे.

नेमक्या कोण आहेत भारती पवार?

  • भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत
  • जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं काम आहे
  • स्वत: डॉक्टर असल्यानं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा.
  • भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं
  • त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं
  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मतं मिळवली .
  • राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केल्यानं ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती.
  • स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्यानं दिंडोरीत ताकद वाढली.

मुंबईत भाजप प्रवेशांनंतर भारती पवार यांनी पक्ष देईल ती जवाबदारी पार पाडू असं सांगितलं. भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचं सूचक वक्तव्य भारती पवार यांनी केलं.

हरिश्चंद्र चव्हाण नाराज

दुसरीकडे भारती पवार यांच्या उमेदवारीनं हरिश्चंद्र चव्हाण नाराज आहेत. भारती पवार यांचे स्वागत आहे, मात्र माझं तिकीट कापल्यास तो तमाम पक्षनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं हरिशचंद्र चव्हाण म्हणाले. माझं तिकीट जाणार नाही याची खात्री आहे, असं देखील चव्हाण यांनी नमूद केलं.

भारती पवार यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जातं आहे. असं झाल्यास भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यात थेट लढत होणार आहे.

दुसरीकडे माकपचे जे.पी गावीत नेमकं कोणाला किती नुकसान करणार, यावर दिंडोरीचं राजकारण अवलंबून असेल. मात्र राज्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपनं मोठं घराणं गळाला लावून पवारांची गोची केल्याची चर्चा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *