Tanaji Sawant : बघून घेतो सर, बघून घेतो म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही बघितलं नाही का? तानाजी सावंतांनी तहसीलदाराला चांगलचं झापलं VIDEO
Tanaji Sawant : आमदार तानाजी सावंत यांनी तहसीलदारांशी दूरध्वनीवर चर्चा केली असली, तरी "पीक कापणी प्रयोगाच्या वेळी लक्ष का दिले नाही?" असा सवाल शेतकरी विचारत आहेत

माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या भूम/परंडा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संतप्त झाले आहेत. मतदारसंघातील महसूल मंडळं विम्यातून वगळल्याने शेतकऱ्यांचा संताप झाला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील 7 महसूल मंडळं पीकविम्यातून वगळली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात रोष आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील 7 महसूल मंडळं पीकविमा भरपाईतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, “अतिवृष्टीच्या वेळी ज्या भागाची आमदार सावंत यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली त्याचं महसूल मंडळांना विम्यापासून वंचित ठेवण्यात आले” आमदार तानाजी सावंत यांच्यापर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर त्यांनी थेट पुण्यातून तहसीलदारांना फोन लावला.
तानाजी सावंत यांनी तहसीलदरांना चांगलचं झापलं, सुनावलं. “आमच्याकडच्या शेतकऱ्यांना 700, 900 रुपये आणि शेजारच्या भागाला काही हजार मिळतात हे कसं काय? इतकी तफावत कशी काय? असा प्रश्न तानाजी सावंत यांनी विचारला. त्यावर तहसीलदरांनी बघून घेतो सर असं म्हटलं. अहो, बघून घेतो म्हणजे काय? सर लोकं आत्महत्या करतील. आंदोलनं सुरु होतील. लोकांचे संसार जळायला लागलेत. आतापर्यंत तुम्ही बघितलं नाही का? तुम्ही संवेदनशील नाहीत का?” अशा शब्दात आमदार तानाजी सावंत यांनी तहसीलदारांचा समाचार घेतला.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
आमदार तानाजी सावंत यांनी तहसीलदारांशी दूरध्वनीवर चर्चा केली असली, तरी “पीक कापणी प्रयोगाच्या वेळी लक्ष का दिले नाही?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्याने काय खंत बोलून दाखवली?
अतिशय लाजिरवाणी, खेदनजक गोष्ट आमच्या बाबत शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे. भूम पंराडा 2025 खरीप विमा मंजूर झाला. विम्याची मंजूर झालेली रक्कम पाहिली तर आंबी, पात्रूड, पारा, पारगावमध्ये 950, 1300, 2700 रुपये पर हेक्टर विमा मंजूर झाला. याआधी खरीप हंगामात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भूम, परांडा, वाशिममध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाली. जनावरं, शेती वाहून गेली. एनडीआरएफचं पथक मदतीसाठी आलं होतं. 25 हजार रुपये हेक्टरी मिळावे अशी अपेक्षा होती. पण 1250 रुपये परतावा मिळाला अशी खंत शेतकऱ्याने बोलून दाखवली.