
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता मनसेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. मात्र त्यांनी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 नोव्हेंबर रोजी पुण्यातील शाखाध्यक्षांच्या सोबत एक बैठक घेतली होती. यावेळी मराठी चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी यांच्यावर राज ठाकरे संतापले अशी चर्चा या बैठकीनंतर झाली. यावर रमेश परदेशी यांनी खुलासा केला होता की माझ्यावर राज साहेब चिडले नाहीत फक्त मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला त्यावरून मला ठाकरे शैलीत त्यांनी मिश्किलपणे बोलले. मात्र यानंतर पुन्हा एकदा अभिनेता रमेश परदेशी यांनी फेसबुक वरती एक फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
या पक्षप्रवेशाबाबत बोलताना रमेश परदेशी म्हणाले की, मी भारतीय संघाचा स्वयंसेवक आहे. माननीय राज ठाकरे साहेब यांच्यासोबत मी गेले वीस वर्षे काम करत आहे. बदललेली परिस्थिती कलाकारांना आणि मराठी सिनेमांना न्याय देण्यासाठी आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मला खुणावत होते म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करत आहे.
पुढे बोलताना परदेशी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे कणखर देश चालवत आहेत. मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेला ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासनाने केंद्राच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. मी संघाचा स्वयंसेवक आहे. प्रत्येक दसऱ्याच्या संचालनाचा फोटो माझा आहे. राज साहेब सुनावलं असं काही नाही पण ते कुटुंब प्रमुख आहेत. प्रश्न हा संसाराचा आणि तत्वांचा आहे. आजच पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे पुढे पाहू.