
राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पक्षांतराला वेग आला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमींग सुरू झालं आहे. आज काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा हिंगोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील भाजपनं मोठा धक्का दिला आहे, बड्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं शिवसेना ठाकरे गटासाठी मोधा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं, दरम्यान हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे, महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, पक्षाला लागलेली ही गळती रोखण्याचं मोठं आवाहन आता शिवसेना ठाकरे गटापुढे असणार आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले, पूर्व विदर्भ युवासेना सचिव तसेच विदर्भातील पहिले आणि एकमेव गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. निलेश बेलखेडे यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील युवा वर्गात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. तर दुसरीकडे भाजपनं काँग्रेसला देखील मोठा धक्का दिला आहे, आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.