
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला हे यश टिकवता आलं नाही. राज्यात महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलं. राज्यात महायुतीचे उमेदवार तब्बल 232 जागांवर विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता होती. या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. याचा फटका काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा सर्वच पक्षांना बसला. दरम्यान अजूनही हे पक्ष प्रवेशच सुरूच आहेत, आता राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत पक्षाची साथ सोडली आहे, त्यामध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तो म्हणजे आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हिंगोली जिल्ह्यात हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रज्ञा सातव या माजी खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते अशी राजीव सातव यांची ओळख होती. मात्र आता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यानंतर हा मराठवाड्यात काँग्रेससाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसह प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, काही कार्यकर्ते आजच मुंबईमध्ये दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. हा राज्यात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.