मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल, कारण काय?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल, कारण काय?
Updated on: Nov 16, 2025 | 11:21 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान सहन करणार नाही –  अमित ठाकरे

या पुतळ्याचे उद्घाटन करताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही! आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त “लोकार्पणासाठी नेता मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे. पण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुणाला खेळ करू देणार नाही.

महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान झाला तर मनसे त्याला उत्तर देणार – अमित ठाकरे

महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणं ही आमची जबाबदारी होती आणि आम्ही ती पार पाडली. त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजेसह नवी मुंबईकरांसाठी दर्शनाकरिता खुला असेल, असे आम्ही जाहीर करतो. ही लढाई इथेच थांबणार नाही. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कुठेही झाला, तर मनसे त्याला थेट उत्तर देईल. आम्ही कोणाला घाबरणारे नाही आणि शिवरायांसाठी तर अजिबात नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय.’

शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही हे लाजिरवाणं आहे – अमित ठाकरे

मनसेने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी म्हटले की, ‘माझी पहिली राजकीय केस शिवछत्रपतींसाठी लढण्याची असेल, तर मला त्याचा आनंदच होईल. निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणारे… यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे.’