ठाकरे गटात पुन्हा सर्वात मोठा भूकंप? खासदाराने उघडच सांगत दिलं उद्धव ठाकरेंना टेन्शन, थेट म्हणाले, उद्याचं काहीच…

परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका विधानाने मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या या विधानामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे.

ठाकरे गटात पुन्हा सर्वात मोठा भूकंप? खासदाराने उघडच सांगत दिलं उद्धव ठाकरेंना टेन्शन, थेट म्हणाले, उद्याचं काहीच...
सजंय जाधव
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 02, 2026 | 11:16 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक हालचाली घडत असतानाच, परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही,” असे सूचक वक्तव्य करत त्यांनी आपल्या पुढील भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यांच्या या विधानामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे.

पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार, पण बदलत्या परिस्थितीचे संकेत

परभणी येथील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार जाधव यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “ज्या पक्षाने मला मोठे केले, त्या पक्षाचा मी आजही आदर करतो आणि उद्याही करत राहीन. ज्यांनी मला संधी दिली त्यांच्याशी प्रतारणा करण्याची माझी मानसिकता नाही. मात्र, बदलत्या परिस्थितीत उद्या काय होईल, हे मी आज ठामपणे सांगू शकत नाही.”

यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील नैतिकतेच्या घसरणीवरही भाष्य केले. राजकारण आता समाजकारणाऐवजी आर्थिक निकषांवर चालत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “आज राजकारणाला आर्थिक निकषांचे मोठे बळ मिळाले आहे. दुर्दैवाने मतदारालाही आता आपल्याला किती ‘नगदी’ मिळते, यात रस वाटू लागला आहे. मतदानाच्या दिवशी मोठ्या घरातील लोकही ‘माझ्या घरात सात मते आहेत’ याची जाणीव करून देत पैशांची अपेक्षा व्यक्त करतात, हा अनुभव आम्ही घेतला आहे.”

खासदार जाधव यांनी आपल्या भाषणात “मन चंगा तो कटोरी में गंगा, नियत में खतरा तो झोली में पथरा” या म्हणीचा वापर करत सूचक संकेत दिले. “आम्ही राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही आमचा निर्णय घेऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

परभणीत राजकीय फेरबदलाचे वारे?

खासदार संजय जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून परभणीत उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, त्यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केलेली ही हतबलता आणि “उद्याचे सांगता येणार नाही” हे वाक्य कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे ठरत आहे. जर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर मराठवाड्यात उद्धव ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जाईल.

Follow Us