
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे, पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीवर आहे, तसेच 300 कोटी रुपयांच्या व्यवहारावर नियमाप्रमाणे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना अवघे 500 रुपये शुल्क भरण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणात कुलमुख्त्यारधारक शीतल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाल्यानंतर, पार्थ पवार यांच्या अमोडिया कंपनीशी संबंधित बोपोडीतील आणखी एक जमीन व्यवहार समोर आला होता, या प्रकरणात देखील कुलमुख्त्यारधारक शीतल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या शितल तेजवानी फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.
मात्र आता बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी यूटर्न घेतला आहे. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही, अशी भूमिका आता पोलिसांनी घेतली आहे.त्यामुळे आता बोपोडी जमीन प्रकरणातून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (अमेडिया कंपनी) यांचं नाव वगळ्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकाच एफआयआरमध्ये दोन जमिनीची प्रकरणे नमूद असल्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना या प्रकरणात अप्रत्यक्ष क्लीन चीट देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान आता बोपोडी जमीन प्रकरणातून नाव वगळ्यात आल्यानं तेजवानी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोगाव पार्क जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर बोपोडी जमीन व्यवहार उघड झाला होता, मात्र या प्रकरणात त्यांचा संबंध नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.