
भारतीय जनता पक्षाचा आज 46 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आज नागपुरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागपुरातील महानगरात भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दटके, तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी नुकतंच शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी उद्धव ठाकरे यांना भाजपच्या वर्धापन दिनाबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला सणसणीत टोला लगावला.
“कोणाचा वर्धापन दिन आहे. तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे का सोयीप्रमाणे. नक्की कशाप्रमाणे वर्धापन दिन आहे. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे हे आधी सांगा. मग मी त्यांना शुभेच्छा देतो. तुम्हालाच जर नक्की माहिती नसेल तर मग शुभेच्छा कशा देणार?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
“माझ्या शुभेच्छा मित्रपक्षाला नव्हे तर सर्वांनाच असतात. रामनवमी हा जर तुमच्या पक्षाचा जन्मदिवस असेल, तर प्रभू रामचंद्र जसे वागले होते, तसा वागण्याचा प्रयत्न करा. या एवढच्या माझ्या त्यांना शुभेच्छा. गेली २७ वर्ष मी तो वनवास समजू का?” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि मोबाईल आपल्या शरीराचा अविभाज्य भाग बनला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर सामान्य माणसाची फसवणूक होत असेल, तर ते निश्चितच चुकीचे आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून केबल जातात, परंतु त्या शेतकऱ्याला कोणताही मोबदला मिळत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले. गरज असल्याने आपण सगळे कर भरतो. पण ही जी लूट सुरू आहे, ती थांबवण्यासाठी शिवसेना आता पुढे येत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.