महायुतीत प्रचंड वादावादी…! शिंदे गटाची एक कृती खटकली; भाजपच्या बड्या नेत्याचा थेट इशारा, म्हणाले, भविष्यात पुन्हा…’
kalyan news : कल्याणमध्ये महायुतीत पुन्हा संघर्ष उफाळला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी एका पक्ष प्रवेशावरून थेट शिंदे गटाला मोठा इशारा दिला आहे.

महायुतीत प्रचंड वादावादी पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या एका निर्णयाने भाजपचा बडा नेता नाराज झाला आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिंदे गटात प्रवेश दिला. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी नाराजी दर्शवत शिंदे गटाला मोठा इशारा दिला आहे. शिंदे गटाने महापौराच्या वेळी युतीच्या पाठीवर खंजीर खुपसला. आता एक कार्यकर्ता घेतला तर आम्ही चार घेऊ, असा इशारा नंदू परब यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर दिला. या इशाऱ्यामुळे महायुतीत संघर्ष पुन्हा उफाळल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वेतील भाजपचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी , आमदार राजेश मोरे आणि जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे आणि नगर सेवक महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय वातावरण तापलं आहे. या पक्षप्रवेशानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर अलिखित युती करार मोडल्याचा आरोप केला आहे. “त्यांनी एक कार्यकर्ता घेतला तर आम्ही चार घेऊ,” असा थेट इशारा नंदू परब यांनी दिला.
महायुतीत असतानाही शिंदेंच्या शिवसेनेने पूर्वी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेऊन महापौर निवडल्याचा आरोप केला. आता युतीच्या पाठीवर खंजीर खुपसल्याची टीका परब यांनी केली आहे. त्याचबरोबर महायुतीत भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस सुरक्षा उपाय तातडीने राबवावेत, अशी सूचना देखील दिली आहे. भाजपमधील नाराज गट शिवसेनेकडे वळत असताना, कल्याण पूर्वेत भाजप विरुद्ध शिवसेना हा जुना संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे
नंदू परब यांच्याकडून आधीही शिंदे गट लक्ष्य
तत्पूर्वी, कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीच्या वेळीही भाजप आणि शिंदे गटात तणाव पाहायला मिळाला होता. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. त्यांनी नाव न घेता राजकीय विश्वासघात, अंतर्गत कुरघोडी आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा संकेत देणारा फोटो पोस्ट करत टीका केली होती. तसेच या पोस्टमध्ये ‘कल्याण–डोंबिवलीच्या जनतेने याचा संबंध भाजपशी लावू नये” असा उल्लेख केला. त्यानंतरही भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मित्र पक्षावर टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.