ठाकरे गटाचा तोच नेता पुतळ्याजवळ 15 मिनिटात पोहोचला कसा? निलेश राणेंच्या सवालाने खळबळ
निलेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटातील एका नेत्यावर मोठा आरोप केला आहे. ठाकरे गटाचा तोच नेता पुतळ्याजवळ 15 मिनिटात पोहोचला कसा? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

Nilesh Rane Target Vaibhav Naik : सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेनंतर विरोधकांनीही आक्रमक पावित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे अजूनही फरार आहे. आता याप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
निलेश राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील एका नेत्यावर मोठा आरोप केला आहे. ठाकरे गटाचा तोच नेता पुतळ्याजवळ 15 मिनिटात पोहोचला कसा? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
निलेश राणेंचं ट्वीट काय?
“आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी”, असे निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक…
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 29, 2024
निलेश राणे यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन पाटील असे याचे नाव असून तो बांधकाम सल्लागार म्हणून काम करत होता. तर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट घेतलेला ठाण्यातील जयदीप आपटे हा सध्या फरार आहे.
नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.
