
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू आहे, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे, यावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता, तसेच डीनो मोरीयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं, यावरून आता नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे, डीनो मोरिया हा मातोश्रीची सून आहे, डीनो मोरिया हा आदित्य ठाकरेंचा बेटर हाफ आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
डीनो मोरिया हा मातोश्रीची सून आहे, डीनो मोरिया अदित्य ठाकरेंचा बेटर हाफ आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना डीनो मोरिया वारंवार घरी जायचे, मुंबईतील सर्व गोष्टीला जबाबदार आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफचे मित्र आहेत. डीनो मोरिया ही मातोश्रीची सून आहे, त्यांचे मातोश्रीशी थेट संबध आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोणाचं सरकार होतं? आदित्य ठाकरे यांनी माझासोबत खुल्या व्यासपीठावर येऊन चर्चा करावी, डीनो मोरियासोबत अय्याशी केली नसती तर मुंबई बुडाली नसती, यांनीच नाईट लाईल गँगला कंत्राटं दिली, त्यामुळे ही अवस्था झाली, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
नारायण राणेंचाही हल्लाबोल
दरम्यान दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत जोरदार पाऊस पडतो, मात्र सरकारला मदत करायची सोडून हे टीका करतात. एकनाथ शिंदेंना नावं ठेवता. तुम्हाला नावं ठेवली तर? आदित्य ठाकरेंना धड मराठी बोलता येत नाही, तोतरे बोलतात, असा टोला राणे यांनी लगावला आहे, दरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमित शाह यांचं नाव घेऊ नये, नाहीतर अडचणीत याल असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे.