ही भूक कधीही न संपणारी असते… तिकीटासाठी इच्छुकांच्या गर्दीवर गडकरी यांची टोलेबाजी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिकीटांसाठी आग्रह धरणाऱ्या इच्छुकांच्या गर्दीवर आपल्या भाषणात चिमटे काढणारे भाषण केले आहे. त्यांनी म्हटले आहे की दुसऱ्यांनी तुमचे नाव सुचवावे असे काम करा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

ही भूक कधीही न संपणारी असते... तिकीटासाठी इच्छुकांच्या गर्दीवर गडकरी यांची टोलेबाजी
| Updated on: Dec 25, 2025 | 7:03 PM

नागपूर: नेहमीच आपल्या बिनधास्त शैलीत बोलणारे आणि वर्मावर घाव घालणारे वक्ते म्हणून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ओळखले जाते. अलिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी इच्छुकांची गर्दी किती वाढली आहे. त्याबद्दल नितीन गडकरी यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या मिश्कीलशैलीत वक्तव्य केले आहे. आजकाल पक्षांची आर्थिक स्थिती चांगली आहे. परंतू आम्ही अनेक लोकांकडून चहा – चिवडा खाल्ला आहे असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्यालाच तिकीट मिळावे; मात्र आता जनता तितकीच हुशार झालेली आहे असेही ते म्हणाले.

अनेक लोकांकडून चहा-चिवडा खाल्ला

दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत इच्छुक उमेदवारांच्यां गर्दीवर भाष्य केले. गर्दीतील प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपल्यालाच तिकीट मिळावे; मात्र जनता आता तितकीच हुशार झाली आहे. आजकाल पक्षाची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे.परंतू आम्हीही अनेक लोकांकडून चहा-चिवडा खाल्ला आहे असे गडकरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की , ‘एकदा मला एक व्यक्ती भेटली. त्याने चहा आणि जिलेबी खाऊ घातली, पण “माझं काय होणार?” असा प्रश्न ती व्यक्ती विचारत होता. मी त्याला म्हणालो, “तू खाऊ घाल, सर्व ठीक होईल.” मात्र, त्यावेळी आमच्या हातात काहीच नव्हते; तरीही तिकीट देणारे आम्ही नाहीत, हे त्यांना माहीत नव्हते असेही गडकरी म्हणाले. आजही अनेक लोक ताणून बसले आहेत. लोकांना वाटते की नितीनजी किंवा देवेंद्रजी सांगतील तर तिकीट मिळेल, असे वाटणे स्वाभाविक आहे असेही गडकरी यावेळी म्हणाले.

ही भूक कधीही न संपणारी आहे

ते पुढे म्हणाले की एक महिला माझ्याकडे आली आणि ‘मला एकदा नगरसेवक बनवा’ अशी इच्छा व्यक्त केली. आम्ही तिला नगरसेवक बनवलं, मात्र महापौर बनवू शकलो नाही.त्यामुळे ती खूप रडू लागली. तिचं रडणं पाहून माझ्या आईने विचारले, ‘हिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला का?’ मी आईला सांगितलं, ‘नाही, हिला तिकीट मिळालं नाही म्हणून रडतेय. नंतर तिला महापौर बनवले. त्यानंतर तिने आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आता पुन्हा ती नगरसेवकाच्या तिकिटासाठी तयार आहे असे सांगत गडकरी म्हणाले की ही भूक कधीही न संपणारी आहे, महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांमध्ये आशा, अपेक्षा आणि आकांक्षा असणे चुकीचे नाही.’

नगरसेवक बनायचे असेल तर आधी काम करा

नगरसेवक बनायचे असेल तर आधी काम करा,अन्यथा तिकीट मागू नका असा सल्ला गडकरी यांनी यावेळी आपल्या भाषणात दिला. ते यावेळी म्हणाले की मला एका ठिकाणी असं समजलं की नवरा, बायको, मुलगा आणि बहिण अशा चौघांनीही तिकीट मागितलं होतं. तेव्हा मी मस्करीत म्हणालो, अजून दोन जण उरलेत – ड्रायव्हर आणि चमच्यालाही तिकीट मागायचं राहिलंय की काय? असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

ते पुढे म्हणाले की कोणी कुठे जन्म घेतला, हा गुन्हा नाही. मात्र, स्वतःच्या पत्नीला तिकीट मिळावं म्हणून आग्रह धरण्यापेक्षा, लोकांनीच “यांना तिकीट द्या” असं सांगावे, अशी परिस्थिती निर्माण होणं अधिक योग्य आणि लोकशाहीला साजेसे आहे.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.