‘पुरात वाहून आलेला नवनाथ बन हा सरडा खूप…’, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने वापरले जिव्हारी लागणारे शब्द

"नवनाथ बना आंतरराष्ट्रीय नेता झाल्याप्रमाणे बोलू नकोस, यापुढे बोललास तर राजकारणात उघडा केल्याशिवाय राहणार नाही" अशा जिव्हारी लागणाऱ्या शब्दात शरद कोळी यांनी टीका केलीय.

पुरात वाहून आलेला नवनाथ बन हा सरडा खूप..., उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने वापरले जिव्हारी लागणारे शब्द
Navnath Ban
| Updated on: Aug 22, 2025 | 10:14 AM

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी आक्रमक भाषेसाठी ओळखले जातात. बऱ्याचदा टीका करताना ते व्यक्तीगत पातळीवर जिव्हारी लागणारी भाषा वापरतात. आता सुद्धा त्यांनी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यावर अशीच टीका केली आहे. “मुंबई, महाराष्ट्रात आलेल्या पुरात भाजपच्या गोटात कचरा वाहून आलाय. पुरात वाहून आलेला नवनाथ बन हा सरडा खूप बोलायला लागला आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बोलण्याची शेंबड्या नवनाथ बन तुझी लायकी काय आहे रे?” अशा भाषेत शरद कोळी यांनी टीका केली आहे.

“तुझ्या बापाला राजकारणात लेकरं होत नाहीत म्हणून तुझ्या बापाने वेळप्रसंगी साडी घालून त्या जोकरला सोबत घेतले. ईडी, सीबीआय लावून राजकारणातली आग भागवून घेण्यासाठी काम तुझा बाप करतोय आणि तू नाकाने लसूण सोलतोय” अशी भाषा शरद कोळी यांनी टीका करताना वापरली. “तू बहुजन, ओबीसी आहे पण हे भाजप तुझा वापर करुन तुझा गळा घोटण्याचे काम करेल. नवनाथ बन तुला बोलायची हौस आहे ना, मग ज्या अजित पवाराने 70 हजार कोटींचा घोटाळा केला. एकवेळ वांजुटं बसू पण अजित पवारांना घेत नाही म्हणत होतात पण त्याला मांडीवर घेऊन बसलात” अशी टीका शरद कोळी यांनी केली.

‘त्यावर तुझं तोंड उचक’

“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी महाराष्ट्राचं वाटोळे केले त्यावर जरा बोलं. शेतकरी आत्महत्या, महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला नेल्या, दंगल घडावी म्हणून जे विष पेरतात त्यावर तुझं तोंड उचक. नवनाथ बना आंतरराष्ट्रीय नेता झाल्याप्रमाणे बोलू नकोस, यापुढे बोललास तर राजकारणात उघडा केल्याशिवाय राहणार नाही” अशा जिव्हारी लागणाऱ्या शब्दात शरद कोळी यांनी टीका केलीय.

राऊत-बन यांच्यात रंगलेला वाद

मध्यंतरी संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यात शाब्दीक वाद रंगला होता. खासदार संजय राऊत यांनी मांसविक्री बंदीवरून सरकारला धारेवर धरलं होतं. अशा प्रकारच्या बंदीने महाराष्ट्राला नामर्द केलं जातंय, असा आरोप राऊतांनी केला होता. या टीकेनंतर भाजपाचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर आरोप केले होते. राऊतांनी संतांचा, वारकऱ्यांचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी बन यांनी केली होती.