
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोलापुरातील एका कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. शरणू हांडे असे मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. शरणू हांडे यांचे अपहरण करणारा मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांना ओपन चॅलेंज देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. रोहित पवारांना मला मारायच असेल तर सांगा, मी बारामतीत कधी येऊ. त्यांनी तारीख सांगावी, वेळ सांगावी आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
मी २०२१ ला घोंगडी बैठका घेत होतो. त्यावेळी मी लहान लहान समाजाला एकत्र करण्याचे काम करत होतो. मी ४०० ते ४५० बैठका घेतल्या होत्या. त्यातीलच एक भाग म्हणजे मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी संध्याकाळी माझ्या गाडीवर दगड टाकला. सूरवसे या व्यक्तीने गाडीवर दगड टाकला, त्याच्या छातीवर शरद पवारांचा टॅटू आहे. त्यावेळी आमचं सरकार नव्हतं. मी तेव्हा त्याच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करा असं सांगत होतो. त्याने मी जिथे बसतोय, तिथे दगड टाकला होता. महादेव देवकाते नावाचा एक व्यक्ती आहे. त्याच्या छातीवरही शरद पवारांचा टॅटू आहे. त्याने माझी भेट घेतली. महादेव देवकाते म्हणतोय की गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती. त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
“शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडीओ कॉल लावला होता. तो कुणाला लावला. पुढून कोण बोलत होतं. कोणत्या फोनवरुन व्हिडीओ कॉल झाला. व्हिडीओ कॉलवर त्याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे. तर याचा सर्व सखोल अभ्यास करा. ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही. कुणीतरी याला पाठीमागे असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही. जर पोलिसांना उशीर झाला असता तर नक्कीच काहीतरी घातपात झाला असता. २०२१ ला माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली त्याची फेरचौकशी झाली पाहिजे. त्यावेळी कोण कोण होतं या सर्वांना अटक करायला हवी”, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.
“याप्रकरणी महादेव देवकाते याचा जबाब नोंदवून जर त्यांची बैठक झाली असेल तर रोहित पवारांना याप्रकरणी आरोपी करायला हवं. या प्रकरणी ३०७चं कलम लावलं पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करता येते का, याचा विचार पोलिसांनी करावा. रोहित पवारांना मी आवाहन करतो की तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांमध्ये कशाला भांडण लावताय. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही समोर या. तुम्हाला मला मारायचं असेल तर मला सांगा मी बारामतीत कधी येऊ. त्यांनी तारीख सांगावी, वेळ सांगावी आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.