
BMC Mayor Selection : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महानगरपालिका निवडणुकीची सगळीकडे चर्चा होती. या निवडणुकीत राज्यभरात एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूक झाली होती. या सर्व महापालिकांपैकी मुंबईची महानगरपालिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती. कारण या पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली जात होती. मुंबई पालिकेच्या निवडणुकीमुळे या दोन्ही भावांच्या युतीची ऐतिहासिक घटना घडली. परंतु या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाच आता मुंबईच्या महापौरपदी नेमकं कोण बसणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता आता संपलेली आहे. कारण येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईकरांना त्यांचा नवा महापौर मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या नव्या महापौराच्या निवडीसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी करण्यात येत आहे. या निवडीसाठी येत्या 6 फेब्रुवारी रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. त्यानंतर महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या महापौरपदासाठी महायुतीत बराच खल चालू होता. निवडणुकीचा निकाल लागताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये हालवले होते. घोडेबाजार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाला मुंबईचे महापौरपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर असल्यामुळे महापौरपदाच्या निवडीची चर्चा रखडली होती. आता फडणवीस परतले असल्याने शिंदे गट आणि भाजपा यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईला महापौर मिळणार आहे.
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ठाणे, कल्याण डोंबिवली एकनाथ शिंदे यांना तर मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर असे गणित ठरल्याचे सांगितले जात आहे. असे असताना आता मुंबईचा नवा महापौर नेमका कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.