Bhandara District hospital fire | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

| Updated on: Jan 09, 2021 | 10:22 AM

मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांना मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

Bhandara District hospital fire | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली
भंडारा रुग्णालयात आग, दहा बाळांचा मृत्यू
Follow us on

भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांना मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांना मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. (10 babies die in fire at Bhandara Government District Hospital)

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा कामावर असलेल्या स्टाफने दार उघडून पाहिलं असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तेव्हा याची माहिती तातडीने वरिष्ठांना देण्यात आली. सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बाळांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं. रुग्णालयातील लोकांनीही यावेळी मदतकार्यात सहकार्य केलं. दरम्यान, शिशु केअर विभागातील मॉनिटर असलेले 7 बालकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी आऊट बॉर्न विभागातील 10 बाळांचा मात्र मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सकांसह अनेक अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच संपूर्ण रुग्णालयाला पोलिसांनी वेढा घातला आहे. आरोग्य उपसंचालक संजय जयस्वालही भंडाऱ्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून दुर्घटनेची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत

अजित पवारांकडून दु:ख व्यक्त

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयांतील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले

संबंधित बातम्या:

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

10 babies die in fire at Bhandara Government District Hospital